क्रेडिट कार्ड सुरू करण्याचा बनाव; सव्वादोन लाखांना ‘चुना’
नाशिक : बँकेचे क्रेडिट कार्ड सुरू करून देण्याच्या बहाण्याने एका सायबर चोरट्याने ४३ वर्षीय व्यक्तीला सुमारे सव्वादोन लाख रुपयांना ‘चुना’ लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फिर्यादी सिरीवालायम मुरली मोहन (४३, रा. अयोध्यानगरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्याने मोहन यांना १ मार्चला दुपारी फोन करून ‘आरबीएल’ नावाच्या बँकेतून बोलत असल्याचे भासविले. तसेच क्रेडिट कार्ड सुरू करून देण्याच्या बहाण्याने त्यांना गोपनीय क्रमांक (पासवर्ड) विचारुन क्रेडिट कार्डद्वारे सव्वादोन लाखांचे ऑनलाइन परस्पर व्यवहार करून गंडा घातल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बँकेचे अधिकारी, प्रतिनिधी असल्याचा बनाव करून फसवे ‘कॉल’ सातत्याने नागरिकांना येत असून नागरिकांनी अशा कुठल्याहीप्रकारच्या फोनवरील संवाद साधणाऱ्या व्यक्तींना प्रतिसाद न देता फोन कट करावा, असे आवाहन सायबर पोलिसांसह बँकांकडून वारंवार करण्यात येत आहे; मात्र तरीही फसवणुकीचे प्रकार थांबलेले दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
---
घरफोडीत ४८ हजारांचा ऐवज गायब
नाशिक : महात्मानगर परिसराला लागून असलेल्या संत कबीरनगर वसाहतीमध्ये राहणारे फिर्यादी राहुल भगवान इनकर (३०) यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील दागिन्यांसह काही रोकड असा सुमारे ४८ हजारांचा ऐवज चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी इनकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गंगापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
---
प्रवासी बसविण्यावरून रिक्षाचालकांमध्ये हाणामारी
नाशिक : इंदिरानगर परिसरातील एका उपनगरीय रिक्षाथांब्यावर दोन रिक्षाचालकांमध्ये हाणामारीची घटना घडली. नीलेश उर्फ काळ्या राजू सोनटक्के (२९, रा. पाथर्डी शिवार) याच्या फिर्यादीनुसार रिक्षाच्या (एमएच १५ एफव्ही ०१६६) चालकाने मंगळवारी (दि.१६) कुरापत काढून शिवीगाळ करीत मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---
शहरात दोघांच्या आत्महत्या
नाशिक : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये एका अल्पवयीन मुलीसह एकाने गळफास घेत आत्महत्या केली. द्वारका येथील मांतगवाडा परिसरात राहणाऱ्या हर्षदा राजेंद्र डांगळे (१६) या मुलीने राहत्या घरात शुक्रवारी (दि.१९) गळफास घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत पांडवलेणी पायथ्याशी असलेल्या कचरा डेपोच्या बाजूला शुक्रवारी सायंकाळी अज्ञात व्यक्तीने गळफास घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.