मालेगाव : येथील कॅम्प व छावणी पोलीस ठाणे हद्दीत सोनसाखळी चोरांनी डोके वर काढले असून, महिलांना पायी चालणेही मुश्कील झाले आहे. या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे.शहराच्या पश्चिम भागात महिलांच्या गळ्यातील दागिने किंवा साखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. गेल्या आठवड्यात पाच ते सात घटना घडल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमेश्वर भागात रोहिणी गिरमे (३८) ही महिला पतसंस्थेच्या बचत पावत्यांचे पैसे गोळा करण्यासाठी जात असताना सुमारे ४५ हजार रुपये किमतीचे दागिने ओरबाडले तर कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील पंचायत समिती कार्यालयाच्या मागील बाजूस शकुंतला येवला, रा.नाशिक यांचे सुमारे सात तोळ्याचे दागिने दुचाकीस्वारांनी ओरबाडले. तिसऱ्या घटनेत बारा बंगला परिसरात घरासमोर एका महिलेच्या गळ्यातील दागिने पायी चालत जाऊन हिसकावण्यात आले.यातील कॅम्प भागात घडलेल्या घटनेत सत्तरवर्षीय महिला धार्मिक कार्यक्रमासाठी शहरातील कृषीनगर भागात आल्या होत्या. ही घटना घडली तेव्हा त्या दोन महिलांसह जात असताना एका दुचाकीवर तीन तरुणांनी दागिने ओरबाडले. त्यावेळी या महिलांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरांनी त्या महिलेला जोरात ढकलून दिल्याने त्या जमिनीवर पडल्या. त्यात त्यांच्या चेहऱ्याला मोठी जखम झाली.पोलीस सोनसाखळी चोरांना पकडण्यात अपयशी ठरत असल्याने चोरांची दादागिरी वाढली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. चोर दागिने ओरबाडण्यासाठी आता मारहाण करत असल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे.पोलिसांनी आॅगस्ट २०१३मध्ये काही चोरांना पकडे होते. त्यावेळी काही संशयिताना राजकीय पदाधिकाऱ्यांमुळे सोडावे लागले होते. या चोरांना पकडल्यानंतर त्याच दिवशी येथील सटाणा रोडवर दोन महिलांचे दागिने ओरबाडून पोलिसांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर काही काळ असे प्रकार कमी झाले होते. मात्र पुन्हा या घटना घडू लागल्या आहेत. (वार्ताहर)
महिला त्रस्त : कॅम्प, छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक प्रकार
By admin | Published: January 31, 2015 12:14 AM