नाशिक : पोलिसातील तक्रार मागे न घेणाऱ्या महिलेवर तलवारीने वार केल्याची घटना शनिवारी (दि़१७) रात्रीच्या सुमारास कर्णनगरमध्ये घडली. लक्ष्मी सुनील पवार (३५) असे जखमी महिलेचे नाव असून या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित संतोष रामु पवार, रामू जेटिबा पवार, शंकर रामु पवार, बाळू हिरामण धोतरे, विलाश बाळू धोतरे, अशा शंकर पवार, ज्योती शंकर पवार (रा. सर्व कर्णनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे़पंचवटी पोलीस ठाण्यात सरला पवार यांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे, ही तक्रार मागे घ्यावी यासाठी रात्री आठ वाजेच्या सुमारास संशयित घरी आले़ त्यांनी लक्ष्मी पवार व त्यांची नणंद सरला पवार यांना पोलिसांतील तक्रार मागे घेण्यास सांगून वाद घातला़ मात्र लक्ष्मी पवार यांनी तक्रार मागे घेणार नसल्याचे सांगताच संतत्प संशयितांनी दोघींना मारहाण केली. तर संशयित संतोष पवार याने तलवारीने लक्ष्मी पवार यांच्या हातावर वार केले.यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
कर्णनगरमधील महिलेवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 1:10 AM