नाशिक : ऐन दिवाळीच्या दिवशी महात्मानगर परिसरातील संत कबीर नगर वसाहत खुनाच्या घटनेने हादरली. नातेवाईकाने धारदार शस्त्राने दोन-पाच नव्हे, तर तब्बल वीस ते पंचवीस सपासप वार करत एका राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याचा निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली. पूजा संदीप आंबेकर (३२, संत कबीरनगर झोपडपट्टी) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. मारेकऱ्याची ओळख पटली असून लवकरच त्याला बेड्या ठोकण्यास यश येईल, असे पोलिसांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून संत कबीर नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या पूजा आंबेकर व संतोष आंबेकर यांच्यामध्ये बुधवारी (दि. ३) मध्यरात्री आर्थिक कारणातून वाद झाला. यावेळी संशयित संतोष विष्णू आंबेकर (३७) याने धारदार शस्त्राने हल्ला चढवून पूजाचा निर्दयी व निर्घृणपणे खून केला. हा प्रकार सकाळी उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पूजाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविला. घटनास्थळी न्याय सहायक वैद्यकीय पथकासह, श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
--इन्फो--
हल्लेखोराची ओळख पटली; पथके मागावर
गेल्या काही दिवसांपूर्वीच संशयित संताेष आंबेकर हा दाेन खुनांच्या गुन्ह्यात शिक्षा भागून कारागृहातून सुटला होता. गुरुवारी सकाळी दाेघांत पैशाच्या वादातून भांडण झाले. तेव्हा संतप्त आंबेकर याने धारदार चाकू काढून पूजाच्या गालावर, पाेटावर आणि मानेवर तब्बल २० ते २५ वार केले. वर्मी खोलवर घाव बसल्याने अतिरक्तस्त्राव होऊन पूजा जागीच ठार झाली. मागील दहा ते बारा दिवसांपासून तो पूजा हिच्यासोबत येथील एका पत्र्याच्या खोलीत राहत होता, असे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोराची ओळख पटली असून त्याच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली आहेत.
---इन्फो--
पूजाचा खून करणारा मारेकरी संतोष हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने यापूर्वीही दोन खून केले आहेत. तसेच त्याच्यावर विविध गुन्हेदेखील यापूर्वी दाखल आहेत. घटना घडली तेव्हा पत्र्याच्या खोलीत हे दोघेच राहत होते. पंधरा दिवसांपूर्वीच संशयित संतोष आंबेकर हा कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर आला होता. त्याने हा तिसरा खून केला असून पथक त्याच्या मागावर आहे. प्रारंभी आर्थिक वाद यामागे असावेत, असे दिसते. पुढे ते तपासातून निष्पन्न होईल.
- रियाज शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक