पंचवटी : म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मखमलाबाद येथे राहणाऱ्या डॉक्टरच्या घरात चोरी करणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील महिलेला म्हसरूळ पोलिसांनी अटक केली आहे. संशयित आरोपी लक्ष्मी मनोज जोशी महिलेने गेल्या सोमवारी सकाळी भरदिवसा बंगल्याच्या पाठीमागील दरवाजाने आत प्रवेश करून घरातून सोन्याचे अडीच तोळे दागिने, चांदीची मूर्ती, टीव्ही व घड्याळ असा ७७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली होती.
याबाबत शिवकृपा बंगला येथे राहणाऱ्या डॉ. श्यामकांत चंद्रकांत थविल यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. म्हसरूळ पोलिसांनी चोरीचा छडा लावण्यासाठी परिसरात बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी केली असतात्यात संशयित महिला दिसून आली पोलिसांनी जोशी हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी तिच्याकडून टीव्ही, सोन्याची चेन, मंगळसूत्र तसेच गणपतीची चांदीची मूर्ती, व घड्याळ असा ऐवज मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक भरतकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संजय पवार, सतीश वसावे, नितीन हुल्लूळे आदींच्या पथकाने कारवाई केली आहे. या महिलेने न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.