सिन्नर : रात्री जेवण केल्यानंतर शतपावलीसाठी पतीसह घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची पोत पल्सर दुचाकीहून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी लांबविली. कमलनगर भागातील कमल टॉवर येथे राहणारे जयदीप भिकूर जव्हेरी (४४) व त्यांची पत्नी प्रीती या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जेवण करून शतपावलीसाठी घराबाहेर पडले होते. रस्त्याने चालत असताना अचानक पल्सर दुचाकीहून दोन चोरटे आले. त्यांनी प्रीती जव्हेरी यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची चेन लंपास केली. त्यात काळे मनी, पैंडल, अडीच तोळे वजनाचे शॉर्ट मंगळसूत्र होते. चेन ओरबडल्यानंतर चोरटे क्षणार्थात पसार झाले. घटनेची माहिती दिल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी दोघा अज्ञात चोरट्यांविरोधात सोन्याची साखळी लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार जाधव अधिक तपास करीत आहेत.
महिलेला शतपावली पडली महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 4:18 AM