सिन्नर : महिलांनी कुणाचेही मन न दुखावता आपली कर्तव्ये पार पाडावी, न्यूनगंड न बाळगता काम करावे, एकविसाव्या शतकात सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना एक पाऊल पुढे असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेत्री तथा लेखक डॉ. निशिगंधा वाड यांनी केले. येथील कामगार शक्ती फाउंडेशनच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात ‘मला भेटलेल्या लेकी-सुना’ या विषयावर मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. कामगार शक्ती फाउंडेशनच्या गृहउद्योग विभागाच्या अध्यक्ष सुषमा नाईकवाडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यास व्यासपीठावर दीप्तीताई राजाभाऊ वाजे, सीमाताई माणिकराव कोकाटे, सीमंतिनी कोकाटे, सविता किरण डगळे आदि उपस्थित होत्या. कामगार शक्ती फाउंडेशनच्या वतीने दीप्तीताई वाजे व सीमाताई कोकाटे यांच्या हस्ते गोंदेश्वर मंदिराची प्रतिमा देऊन डॉ. निशिगंधा वाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हळदी-कंकू समारंभ पार पडला. कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल सरवार यांनी प्रास्ताविक केले. किरण भावसार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. रवींद्र गिरी यांनी सूत्रसंचालन केले. सुषमा नाईकवाडी यांनी आभार मानले. याप्रसंगी प्रमिला सरवार, जया भोसले, स्वाती गिरी, आरती जोंधळे, नम्रता नवले, स्मिता कदम, अश्विनी वैद्य, दीपाली कडलग, सुनीता साबळे, दीपाली चिंतामणी, विजया सरवार आदिंसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (वार्ताहर)
महिला एक पाऊल पुढे
By admin | Published: February 05, 2017 11:39 PM