नाशिक- शहरातील कॉलेज रोडवरील एका मॉलच्या मल्टिप्लेक्समध्ये 'कश्मीर फाइल्स' चित्रपटाच्या शोप्रसंगी काही महिला भगवे मफलर घालून आल्या होत्या. यामुळे त्यांना प्रवेशास अटकाव करण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. मात्र नंतंर, या महिलांनी चित्रपटापूर्वीच आपले भगवे उपरणे जमा केले. या घटनेचे व्हिडिओही बुधवारी सायंकाळी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 'कश्मीर फाइल्स' चित्रपटात ३२ वर्षांपूर्वी तेथील काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण आहे. त्या पार्श्वभूमीवर समाजात चित्रपटाबाबत दोन मतप्रवाह दिसून येत आहेत.
या महिला बुधवारी भगव्या रंगाचे उपरणे घेऊन चित्रपटगृहात प्रवेश करीत असतानाच, त्यांना मल्टिप्लेक्सच्या आतील प्रवेशव्दारावरच रोखण्यात आले. यावेळी महिलांनी प्रथम आतमध्ये जाऊ देण्याबाबत आग्रही भूमिका घेतली. मात्र, तरीही द्वाररक्षकांनी त्यांना आतमध्ये जाण्यास मनाई केल्याने या महिला आणि युवती संतप्त झाल्या होत्या.
बुधवारी दुपारच्या सुमारास कॉलेजरोडवरील मल्टिप्लेक्समध्ये महिलांच्या मोठ्या समूहाने सिनेमाची तिकीटे बूक केली होती. यावेळी या समूहाची ओळख म्हणून भगव्या रंगाचे उपरणे अथवा मफलर गळ्यात घालून या महिला मल्टिप्लेक्समध्ये आल्या होत्या. मात्र, मल्टिप्लेक्सच्या व्यवस्थापनाने त्यांना उपरणे बाहेरच ठेवावीत, चित्रपटगृहात उगाच काही वाद नको आणि चित्रपट संपल्यावर उपरणे पुन्हा घेऊन जा, अशी विनंती केली. यावर महिलांनी आपली उपरणी सुरक्षारक्षकांच्या टेबलावर काढून ठेवली होती.
यानंतर चित्रपट सुरु असताना ही माहिती बाहेर परसली आणि काही युवक घटनास्थळी आले. चित्रपट संपल्यानंतर त्यांनी महिलांकडे यासंदर्भात विचारणा केली, यावर हो आम्हाला उपरणी बाहेर काढून ठेवण्यास सांगण्यात आले, असे या महिलांनी सांगितले. यानंतर काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. पण नंतर, पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि यानंतर पोलिसांच्या मध्यस्तीने वाद मिटला.
हेच तुमचे हिंदूत्व? उद्धव ठाकरेंना भाजपचा सवाल -या संपूर्ण प्रकरणावर महाराष्ट्र भाजपने एक ट्विट करत ते सीएम उद्धव ठाकरे यांना टॅग केले आहे. यात म्हणण्यात आले आहे, "नाशिक मध्ये, चित्रपटगृहात भगवी शॉल घालून 'द कश्मीर फाईल' पाहण्यासाठी जाणाऱ्या महिलांना पोलिसांनी रोखलं! चित्रपटगृहाच्या गेटवर शॉल उतरवून घेण्यात आल्या.@OfficeofUT जी हेच हिंदुत्व तुमचं?"
शिवसेना झाली 'जनाब सेना' -भाजपने आपल्या ट्विटमध्ये शिवसेनेच्या हिंदुत्वाप्रति असलेल्या निष्ठेवरच प्रश्नचिन्ह लावले आहे. एवढेच नाही, तर हिरवा रंग असा शब्द वापरत, ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आता 'जनाब सेना' झाल्याचा दावाही भाजपने केला आहे.