नाशिक : नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने क्षेत्ररक्षण प्रशिक्षक डॉ. भाविक मंकोडी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित महिला क्रिकेटपटूंसाठीचे क्षेत्ररक्षण शिबिर उत्साहात पार पडले. गोल्फ क्लबवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे १७ ते २२ ऑगस्ट असे सहा दिवस दररोज सकाळी ७.३० ते १० या वेळेत अत्यंत उत्साही वातावरणात शिबिर घेण्यात आले. कै. अविनाश आघारकार स्पर्धेतून या सर्वोत्तम ३० महिला क्रिकेटपटू शिबिरासाठी खास निवडल्या होत्या. सुयोग्य, शास्त्रीय पद्धतीने क्षेत्ररक्षणासाठीचे तंत्र, बारकावे व त्या अनुषंगाने विविध प्रकारचे व्यायाम, विविध खेळांतून शिकवून करून घेण्यात आले. सध्या संभाव्य ३५ खेळाडूंच्या भारतीय संघाच्या राष्ट्रीय शिबिरात सहभागी असलेल्या नाशिकची महिला क्रिकेटपटू माया सोनवणेच्या पावलावर पाऊल टाकून भविष्यात राज्य व राष्ट्रीय संघाकडून खेळण्याच्या दृष्टीने उपयोग होईल, अशी अपेक्षा सचिव समीर रकटे यांनी व्यक्त करीत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
महिला क्रिकेटपटूंचे शिबिर संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 4:18 AM