देवळा : पर्यावरणातील महत्त्वाचा घटक असलेल्या चिमणी या पक्ष्याचे संवर्धन व्हावे या उद्देशाने चिमणी पार्कची संकल्पना राबविण्यात आली आहे.आधुनिक जगात स्वत:चा निवारा उभारताना मानवाने मुक्या पशुपक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासावर अतिक्र मण करून त्यांची घुसमट करून टाकली आहे. मानवाची जीवनशैली, वाढते तापमान, अवाजवी वृक्षतोड, सीमेंटच्या इमारतींचा पसारा, मोबाइल टॉवर्स, तसेच प्रदूषणाची वाढत चाललेली पातळी आदींमुळे जैवविविधतेची हानी होत आहे. जैवविविधतेतील चिमणी हा पक्षी महत्त्वाचा घटक, परंतु त्यांची संख्या वेगाने कमी होत चालली आहे. त्याचे गंभीर परिणाम मानवाला भोगावे लागत आहेत.गत १३ वर्षांपासून देवळा तालुक्यातील महिलांनी महिलांसाठी सुरू केलेली एकमेव पतसंस्था असलेल्या आशापुरी महिला पतसंस्थेने महिलांच्या आर्थिक गरजा पूर्ण करीत असतानाच वेळोवेळी सामाजिक कार्यातही सहभागी होत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. वर्धापन दिनाचे औचित्य साधून देवळ्यात ‘चिमणी पार्क’ ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवत सुमारे ५० चिमण्यांसाठी घरट्यांचे अनावरण करून संस्थेचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. पतसंस्थेच्या परिसरातील वृक्ष व इमारतींवर चिमण्यांच्या अधिवासासाठी ५० घरटी लावण्यात येऊन चिमणी पार्कतयार करण्यात आला.यावेळी कोमल कोठावदे, सीमा मेतकर, दीपाली जाधव, प्रियंका कोठावदे, अलका शिरोरे, मंगल कोठावदे, शीतल अहिरराव, विमल धामणे, वंदना आहेर, छाया निकम, अर्चना वाघमारे, प्रीती ठक्कर, अनिता आहेर, सुनील सोनवणे, नंदू खरोटे आदी उपस्थित होते.
देवळ्यात महिलांनी साकारले ‘चिमणी पार्क’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 7:15 PM
पर्यावरणातील महत्त्वाचा घटक असलेल्या चिमणी या पक्ष्याचे संवर्धन व्हावे या उद्देशाने चिमणी पार्कची संकल्पना राबविण्यात आली आहे.
ठळक मुद्देअनोखी संकल्पना : पक्ष्यांच्या संवर्धनासाठी राबविला उपक्रम