पंचायत समित्यांनी पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी खर्चाचा आराखडा तयार करून पाठविला असूनही कामांना प्रशासकीय मान्यता मिळत नसल्याची तक्रार सर्वसाधारण सभेत नांदगाव पंचायत समितीचे सभापती सुभाष कुटे यांनी केली. त्यावरून पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी नियोजनाच्या विषयाला तोंड फुटले. कविता धाकराव यांनी पंधराव्या वित्त आयोगाचा प्रत्येक सदस्याच्या गटासाठी किती निधी मिळणार? असा सवाल केला. तर नयना गावीत, मनीषा पवार यांनी निधी समान वाटपाचे ठरलेले असतांना त्याचे काय झाले, असा प्रश्न अध्यक्षांना विचारला. या विषयावर मात्र सर्वपक्षीय गटनेत्यांनी व सभेत प्रत्येक विषयावर बोलणाऱ्यांनी चुप्पी साधली. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी कोविड काळ, पंचायतराज समिती, आदिवासी कल्याण समितीच्या दौऱ्यामुळे नियोजन करणे शक्य झाले नसल्याचे सांगितले. त्यामुळे येत्या आठ ते दहा दिवसांत नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
चौकट===
दोन वर्षे मुदतवाढीचा ठराव
कोरोना काळात दीड वर्षे सदस्यांना त्यांच्या मतदारसंघात काहीच कामे करता आली नाही. तसेच प्रशासनातील अधिकारीदेखील कोरोना काळात मग्न असल्यामुळे कामे झाली नसल्याने सदस्यांना गटात कामे करण्यासाठी दोन वर्षे मुदतवाढ देण्यात यावी, असा ठराव या सभेत उदय जाधव यांनी मांडला. सदस्यांना मुदतवाढ मिळाली तर पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करणे सोपे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चौकट===
महिला सदस्याला कोसळले रडू
वडाळीभोई येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अत्यंत मोडकळीस आली असून, चार वर्षांपासून या केंद्राचे नूतनीकरण करण्यात यावे, यासाठी सभागृहात प्रत्येक वेळी प्रश्न उपस्थित करूनही उपयोग होत नसल्याबद्दल कविता धाकराव या महिला सदस्याला सभागृहातच रडू कोसळले. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधीची तरतूद नसल्याचे एकच उत्तर चार वर्षांपासून मिळत असल्याचे सांगत असताना धाकराव आपल्या अश्रू आवरू शकल्या नाहीत. त्यांची ही अवस्था पाहून सिमंतीनी कोकाटे, मनीषा पवार या सदस्यांनी यापुढे जिल्हा परिषदेला प्राप्त होणाऱ्या निधीतून सर्वांत अगोदर धाकराव यांच्या आरोग्य केंद्रासाठी निधी राखून ठेवण्याची सूचना केली.