हिंगोली : पोलिसांच्या डोळेझाकीमुळे ब्राह्मणवाडा येथे खुलेआम दारू विक्रीने गाव व्यसनाच्या आहारी गेले आहे. तक्रारी करूनही पोेलिस दाद द्यायला तयार नव्हते. नव्यानेच महिला पोलिस अधीक्षक रुजू झाल्या. एकदा त्यांच्याकडेच ही समस्या मांडायची म्हणून महिला निघाल्या तर त्यांना आदर्श महाविद्यालयाजवळ गोरेगाव पोलिसांनी अडवून मनधरणीचा सूर आळवला. दुपारी आलेल्या महिलांनी अधीक्षकांना भेटण्यासाठी आडकाठी आणली. महिलांनी निर्धार करीत एसपी एन. अंबिका यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. १८०० लोकसंख्येच्या गावात जवळपास ४०० जणांचे संसार दारूमुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचा त्रास घरातील महिलांना व मुलांना होत आहे. घराघरात वाद वाढून भांडण, तंटे विकोपाला जात असल्याचे महिलांनी सांगितले. यापुढे गावात दारूची विक्री होवू देऊ नका शिवाय बाहेरून पिऊन येणाऱ्यांविरूद्ध कडक करावाई, करा अशी त्यांची मागणी आहे. यापूर्वी पोलिसांनी तक्रारीची टोपली दाखवून उलट महिलांनाच कसे वेठीस धरले, याचाही पाढा वाचला. यावेळी गिताबाई पंडित, कुसूम पंडित, गंगुबाई पंडित, विशाखा पंडित, आशा वैद्य, लक्ष्मी वैद्य, कमलाबाई वैद्य यांच्यासह ५० महिला उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
महिलांची पोलिसांकडून मनधरणी
By admin | Published: August 20, 2014 12:03 AM