----
पंचवटी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने कठोर निर्बंध लागू करीत संचारबंदी जारी केली आहे. विनाकारण रस्त्यावर फिरण्यास मनाई केली आहे. असे असताना विनाकारण फिरणाऱ्या दोघांना काट्यामारुती चौकात नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी अडविले. यावेळी कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसाशी वाद घालून शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दोघांवर दाखल केला आहे. तसेच एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत महिला पोलीस कर्मचारी कमल काशिनाथ ठाकरे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी ठाकरे सोमवारी (दि.२६) सायंकाळी पाच वाजता काट्यामारुती पोलीस चौकीबाहेर नाकाबंदी दरम्यान कर्तव्य बजावत होत्या. त्यावेळी अवेंजर दुचाकीने (एम. एच. १५, एफ. जी. ४७३९) आडगाव नाक्याकडून संशयित तुषार सुब्रमण्यम पिलई, पूजा अनिल कुमावत असे हे दोघे येताना दिसले. त्यांना ठाकरे यांनी थांबवून ‘कुठे चालले? संचारबंदी लागू आहे आवश्यक काम असेल तर जा’ असे सांगितले. याचा राग आल्याने तुषार व पूजा यांनी ठाकरे यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली तसेच ‘आम्ही कुठेही फिरू’ असे म्हणून गणवेश पकडून शासकीय कामात अडथळा आणला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी तुषार याला अटक केली आहे.