सटाणा : बागलाण तालुक्यातील छपन्न गावांतील रिक्त असलेल्या पोलीसपाटील पदांना नुकतीच सहाय्यक आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. या पदांच्या भरतीप्रक्रियेसाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीत ५६ पैकी १७ गावांची पाटीलकी आता महिलांना करण्याची संधी मिळाली आहे.बागलाण तालुक्यातील अनेक गावांचे पोलीसपाटील पद रिक्त होते. पोलीसपाटील म्हणजे पोलीस प्रशासन आणि गावकरी याच्यातला दुवा मानला जातो. मात्र गेल्या चार ते पाच वर्षांपासून तब्बल छपन्न गावांचे पोलीसपाटील पद रिक्त असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखताना पोलीस प्रशासनाची चांगलीच दमछाक होत होती. रिक्त पदाच्या मंजुरीसाठी विभागीय सहाय्यक आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. सहाय्यक आयुक्तांनी नुकतीच छपन्न पदांना मंजुरी दिली आहे. या भरती प्रक्रियेसाठी तीस टक्के महिला व प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. त्यासाठी काल सोमवारी येथील तहसील कार्यालयात सोडत ठेवण्यात आली होती. ही सोडत या सोडत प्रांताधिकारी संजय बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली. अंश पोतदार या चिमुकल्याच्या हस्ते चिठ्ठी काढून ही सोडत काढण्यात आली. यावेळी तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार, नायब तहसीलदार आबासाहेब तांबे यांनी ही सोडत प्रक्रि या राबविली.यावेळी तालुक्यातील पाटीलकीसाठी इच्छुकांनी तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली होती. (वार्ताहर)