नाशिक : कुटुंबाचा प्रमुख आधार या महिला असून, त्यांना समाजातील अनेक समस्या, अन्याय तसेच घटनांना सामोरे जावे लागते़ अन्याय, अत्याचाराचा महिलांनी निर्भीडपणे विरोध करावा, पोलीस सदैव तुमच्यासोबत आहेत, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी केले. आडगाव पोलीस मुख्यालयात ‘जागर स्त्री आरोग्याचा’ या उपक्रमांतर्गत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन सुविधेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ महिलांना घरगुती कामांसह कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी पार पाडावी लागते़ नोकरदार महिलांना नोकरी व कुटुंब या दोन्हींमुळे स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही़ महिलेचे आरोग्य बिघडले की कुटुंबाचे स्वास्थ्य बिघडत असल्याने स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे़ महिलांना सामाजिक सुरक्षा, गुन्हे, अन्याय, महिलांविषयक कायदे यांसह आरोग्यविषयक समस्यांबाबत महिलांना जागरूक करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे दराडे यांनी सांगितले़ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुवर्णा पवार यांनी औषधोपचाराबाबत माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, रोहिणी दराडे, नमिता कोहोक, मनमाड उपविभागाच्या सहायक पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांच्या हस्ते सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन सुविधेचे उद्घाटन करण्यात आले.
महिलांनी अन्यायाचा सामना करावा : दराडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:42 AM