नाशिकरोड : महिलांची आपली भूमिका, आपली मतं असली पाहिजेत. आपल्यावरील अन्यायाबाबत महिलांनी वेळीच बोलले पाहिजे. चुप्पी तोडली पाहिजे. या जन्मात असे उदात्त कार्य करा की, पुढील सात पिढ्यांनी आपली आठवण काढली पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. प्रतिभा जाधव-निकम यांनी केले.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेतर्फे ऋतुरंग भवनमध्ये प्रा. जाधव यांनी ‘मी अरु णा बोलतेय’ हे नाटक सादर केले. तीस वर्षांपूर्वी मुंबईच्या के. ई. एम. रुग्णालयात अरुणा शानबाग या परिचारिकेवर अत्याचार झाला होता. त्या कोमात गेल्यानंतर नातेवाइकांनी त्यांना वाळीत टाकले. मात्र, शासन, हॉस्पिटल प्रशासन व महिला सहकाऱ्यांनी मरणासन्न अवस्थेतील अरु णाची सेवा करून तिला अनेक वर्षे जगवले. अशा अरु णाची कहानी प्रतिभा जाधव यांनी सादर केली. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले. प्रयोगानंतर प्रा. जाधव म्हणाल्या की, आयुष्यात काही वाईट केले तर त्याचा हिशेब द्यावाच लागतो. पाच वर्षांपासून हा नाट्यप्रयोग सादर करत आहे. अरु णा काळजापासून मेंदूपर्यंत विचार करायला प्रवृत्त करते. महिलांनी आपल्यावरील अन्यायाबाबत वेळीच आवाज उठविला पाहिजे.यावेळी मसापचे कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी, दत्ता गायकवाड, नितीन ठाकरे, सुजाता हिंगे, दशरथ लोखंडे, रवींद्र मालुंजकर, वसंत पाटील, सुधाकर जाधव, विश्वास गायधनी, कामिनी तनपुरे, सुमन हिरे, वर्षा देशमुख, सुरेखा गणोरे, वासंती ठाकूर, माधवी मुठाळ, वैशाली राठोड, जयश्री लाहोटी, गीता लोखंडे, प्राचार्य कºहाडकर, संगीता पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. वर्षा देशमुख यांनी प्रास्ताविक, तर ज्योती कदम यांनी सूत्रसंचालन केले. वासंती ठाकूर यांनी आभार मानले.
महिलांनी आपली भूमिका ठामपणे मांडावीत : जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 1:00 AM