सिन्नर : तालुक्यातील सोनांबे येथील महिला दारूबंदीसाठी सरसावल्या असून गावात होणारी अवैध दारूविक्री बंद करण्यात यावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सोनांबे येथे गेल्या काही वर्षांत अवैधरीत्या दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे. देशी दारूच्या अवैध विक्रीमुळे गावातील तीन ते चार जणांचे बळी गेल्याने अशा कुटुंबाचे संसार उघड्यावर आल्याचे निवेदनात म्हटले आहे. गावात संपूर्ण दारूबंदी करावी यासाठी महिला ठामपणे एकवटल्याचे म्हटले आहे. सोनांबे येथे अवैध दारूविक्री बंद करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांच्याकडे वारंवार मागणी करण्यात आली; मात्र दारूबंदी न झाल्याने पदरी निराशा पडल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी शेकडो महिलांनी आपल्या स्वाक्षरीने मुख्यमंत्र्यासह अनेकांना या निवेदनाच्या प्रती फॅक्सद्वारे पाठविल्या आहेत. वारंवार मागणी करुन पदरी निराशा पडली आहे. दारूबंदी करण्यासाठी आमची मनगटे मजबूत आहेत पण कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करुन प्रशासकीय यंत्रणेचे बळ आमच्या पाठीशी उभे राहावे अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. ज्या तरुणांच्या जीवावर भविष्याची मदार अवलंबून आहे अशा कर्त्या पुरुषांची वाकडी पावले पडू नये यासाठी दारुबंदी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. व दारुविक्रेत्यांविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर सुमारे ४५० महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सदर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी सरपंच सौ. पुष्पा पवार, शंकर लोंढे, शकुंतला पवार, नीता जगताप, रामनाथ डावरे, रामनाथ शिंदे, भरत पवार यांच्यासह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
दारुबंदीसाठी सोनांबे येथील महिला सरसावल्या
By admin | Published: September 09, 2016 12:36 AM