उमराणे : देवळा तालुक्यातील सांगवी येथे तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीकडून अनियमितपणे टँकरने होत असलेला पाणीपुरवठाही अत्यंत दूषित होत आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांसह महिला वर्गाने ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी गावात नियमित व पिण्यासाठी चांगले पाणी मिळावे, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.सांगवी व सांगवीपाडा येथे गेल्या अनेक दिवसांपासून विहिरींनी तळ गाठल्याने गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. परिणामी पंचायत समितीकडून येथे पाणीपुरवठा करण्यात येत होता.परंतु वाहनधारकांची बिले थकल्याने तोही पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आला होता. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे अतोनात हाल होत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ग्रामस्थांनी चर्चा करून पाण्याचे टँकर सुरू केले; परंतु टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा अत्यंत दूषित होत असून, पिण्याच्या पाण्यात जंतूही आढळल्याने हे पाणी पिण्यासाठी तर दूरच परंतु वापरण्यासही योग्य नाही. त्यामुळे पंचायत समितीने एक प्रकारे तहानलेल्यांची थट्टाच केली आहे. दूषित पाण्यापासून विविध आजारांना सामोरे जाण्याची भीती ग्रामस्थांमध्ये व्यक्त केली आहे. सदर दूषित पाण्याचे नमुने ग्रामपंचायत कार्यालयाकडे नेऊन ग्रामस्थांसह महिलांनी मोर्चा काढला. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामसेवक व कर्मचारी हजर नसल्याने ग्रामस्थांनी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर आलेल्या ग्रामसेवकास दूषित पाण्याबद्दल विचारले असता त्यांनी थातुरमातूर उत्तरे देत ग्रामस्थांची बोळवण केली. दरम्यान, सदर दूषित पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. संबंधित विभागामार्फत त्याची चौकशी करण्यात यावी व नियमितपणे चांगल्या पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी रूपेश होलगडे, श्रावण बस्ते, सिंधूबाई बस्ते, लताबाई जाधव, सुंदरबाई बस्ते, रेखाबाई जाधव, योगेश बस्ते, नंदलाल जाधव, योगेश बस्ते, रामप्रसाद व्हलगडे, मधुकर बस्ते आदिंसह ग्रामस्थ व महिलांनी केली आहे. (वार्ताहर)
सांगवीत महिलांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा
By admin | Published: June 14, 2014 1:18 AM