नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी येत्या मंगळवारी (दि. २१) निवडणूक होणार असून, पालिकेच्या बदललेल्या राजकीय समीकरणात ही माळ राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे.महिला व बालकल्याण समिती सभापती आणि उपसभापतिपदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक होणार आहे. त्यासाठी शनिवारी (दि. १८) सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. या समितीत मनसेच्या सुवर्णा मटाले, सविता काळे, सुमन ओहोळ, भाजपाच्या सीमा हिरे, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या रंजना बोराडे, कॉँग्रेसच्या योगिता अहेर, शिवसेनेच्या वतीने मनीषा हेकरे आणि ललिता भालेराव या सदस्य आहेत. गेल्या वेळी मनसे आणि भाजपाची युती असल्याने मनसेच्या दीपाली कुलकर्णी यांना डावलून भाजपाच्या सीमा दलवाणी यांना सभापतिपद देण्यात आले होते; परंतु आता महापौरपदाच्या निवडणुकीत मनसे, राष्ट्रवादी, कॉँग्रेस आणि अपक्ष यांची युती झाली. महापौरपद मनसेकडे आणि उपमहापौरपद अपक्ष गटाकडे गेले आहे. राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेता पदाची मागणी केली असली, तरी मनसेशी त्यांच्या झालेल्या चर्चेनुसार पालिकेतील अन्य समित्यांमध्ये राष्ट्रवादीला संधी देण्यात येणार आहे. ही राजकीय तडजोड बघितली, तर महिला व बालकल्याण समितीचे सभापतिपद राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. आता उपसभापतिपदासाठीही प्रथमच निवडणूक होत असल्याने हे पद मनसे किंवा कॉँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे.विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र निवडणूक लढविणाऱ्या या पक्षांची महापालिकेत एकी आहे. तथापि, आता सभापतिपद कोणत्या पक्षाला द्यावे याबाबत निर्णय घेण्याचे टाळले जात असून, रविवारी विधानसभा निवडणूक संपल्यानंतर राजकीय तडजोडींना पुन्हा सुरुवात होणार आहे. (प्रतिनिधी)
महिला बालकल्याण सभापतिपद राष्ट्रवादीला?
By admin | Published: October 16, 2014 9:33 PM