नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर ९ सदस्यांची नियुक्ती शनिवारी (दि.१५) होणाऱ्या महासभेत महापौरांकडून घोषित केली जाणार आहे. मात्र, महिला व बालकल्याण समितीची होणारी उपेक्षा व फरफट पाहता समितीवर ज्येष्ठ सदस्य जाण्यास नाखूश असल्याने पक्षनेतृत्वाकडून नव्यानेच निवडून आलेल्या सदस्यांना बोहल्यावर चढविले जात आहे. त्यामुळे समितीवर बव्हंशी चेहरे नवीन असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महिला व बालकल्याण समितीवर ९ सदस्य नियुक्त केले जाणार आहे. तौलनिक संख्याबळानुसार भाजपाचे ५, शिवसेनेचे ३ तर कॉँग्रेस व राष्ट्रवादी या दोघांपैकी एक सदस्य समितीवर नियुक्त केला जाईल. या समितीवर मनसेला मात्र प्रतिनिधित्व मिळणार नाही. महापौरांनी ‘रामायण’वर गटनेत्यांची बैठक घेऊन त्यांना तौलनिक संख्याबळाची माहिती दिली व सदस्यांच्या नावांची शिफारस करण्याची सूचना केली. दरम्यान, शुक्रवारी (दि.१४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेला सुटी असल्याने सेना-भाजपाची गुरुवारीच पार्टी मिटिंग झाली. यावेळी महिला व बालकल्याण समितीवर नियुक्त करण्यात येणाऱ्या सदस्यांबाबत चर्चा करण्यात आली. मात्र, महिला व बालकल्याण समितीला आजवर प्रशासनाकडून मिळणारी दुय्यम वागणूक व अपुरा निधी यामुळे ज्येष्ठ नगरसेवक समितीवर सदस्य म्हणून नाखूष आहेत. त्यामुळे गटनेत्यांची पंचाईत झाली असून, नव्याने निवडून आलेल्या महिलांचीच त्यावर वर्णी लावावी लागणार आहे. नव्याने निवडून आलेल्या काही महिला सदस्यांनीही समितीवर नियुक्त होण्याबाबत नापसंती व्यक्त केल्याचे समजते. महिला व बालकल्याण समितीचे यापूर्वी सभापतिपद भूषविणाऱ्या वत्सला खैरे यांनी समितीच्या कामकाजावरून प्रशासनाला धारेवर धरले होते आणि समितीच बरखास्त करून टाकण्याची मागणी केली होती. कै. आशाताई भोगे यांच्या कारकिर्दीतच समितीमार्फत बऱ्यापैकी कामे झाली, मात्र त्यानंतर समितील दुय्यमच लेखले जात असल्याची भावना महिला सदस्यांमध्ये आहे. त्यामुळे समितीवर जाऊनही बैठकांना अनुपस्थित राहण्याचे चित्र दिसून येते. (प्रतिनिधी)
महिला बालकल्याण समिती सदस्यत्व नवख्यांच्या माथी?
By admin | Published: April 14, 2017 1:26 AM