अझहर शेख, नाशिक : ‘दबंग’ आयपीएस महिला पोलीस अधिकारी अशी ओळख असलेल्या डॉ. आरती सिंग यांच्य रूपाने नाशिक जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला पोलीस अधिक्षक लाभली आहे. जिल्ह्याच्या बॉर्डरवर चोख गस्त वाढविण्यासोबतच सायबर जनजागृतीसह महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक पुन्हा ताकदीने कार्यान्वित करण्याचा निर्धार सिंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. जिल्ह्याच्या सीमेवर्ती भागात वाढणारे अवैध धंद्यांची पाळेमुळेही उखडून फेकले जाणार असून आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर कायदासुव्यवस्थेसोबत कुठलीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे ठणकावून सांगत ‘खाकी’च्या कर्तव्यात क ोणाकडूनही क चुराई झाल्यास सहन केली जाणार नसल्याचाही रोख-ठोक इशारा सिंग यांनी दिला आहे.
सिंग यांच्या पोलीससेवेचा इतिहास पाहता त्यांची पहिली नेमणूकच मोठी आव्हानात्मक होती. २००६च्या आयपीएस बॅचच्या अधिकारी असलेल्या सिंग यांनी नेहमीच धाडसी कामगिरीवर भर दिला आहे. त्यांची पहिली नियुक्ती गडचिरोलीसारख्या नक्षलवादी भागात झाली होती. ही नियुक्ती त्यांच्यासाठी मोठी आव्हानात्मक होती. भंडारा जिल्ह्यात गाजलेल्या मुरबाड कांडचा छडाही त्यांनी अत्यंत कौशल्याने लावला होता. डॉ. आरती सिंग यांनी आपल्या करियरची सुरूवात एक स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून (एम.बी.बी.एस) केली होती. त्यांनी त्यानंतर युपीएसस्सीची स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण करून आयपीएसची निवड केली. २००६च्या त्या आयपीएस कॅडेट आहे. गडचिरोलीनंतर भंडारा, नागपूर अशा जिल्ह्यांमधून पोलीस अधिक्षकपदाचा कारभार चोखपणे बजावत विदर्भातून सेवा सुरू करणा-या सिंग यांनी औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाची धुराही तितक्याच सक्षमपणे सांभाळली. औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला कोयगाव परिसरात हिंसक वळण लागले होते. तेव्हा पोलीस दलावरही हल्ला करण्यात येऊन एक पोलीस जखमी झाला होता. यावेळी झालेल्या तणावाच्या परिस्थितीवर सिंग यांनी चोख नियोजन व योग्य निर्णय घेत नियंत्रण मिळविले होते.
नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या पोलीस अधिक्षकपदाची सुत्रे अद्याप पुरूष अधिका-यांच्याच हाती राहिलेली आहे. ग्रामीण पोलीस अधिक्षक म्हणून पहिल्यांदाच सिंग यांच्या रूपाने महिला पोलीस अधिकारी जिल्ह्याला लाभला. आगामी लोकसभा निवडणूक आणि पंधरा तालुक्यांचा जिल्हा असलेल्या नाशिकमध्ये ग्रामीण भागात अधिक जास्त आव्हान राहणार आहे. तसेच जिल्ह्याजवळ गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांच्या सीमादेखील आहे. त्यामुळे अवैधमार्गाने येणारी शस्त्रे, मद्य रोखण्यापासून जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था सुधारण्याचे मोठे आव्हान सिंग यांच्यापुढे आहे. हे आव्हान लक्षात घेता सिंग यांनी त्यांच्या कार्यानुसार आराखडा आखला आहे. त्या आराखड्यानुसार ग्रामीण पोलीस दल आता कार्यरत राहणार असल्याचे दिसून येईल. सिंग यांनी त्यांचा आराखडा तितका स्पष्ट केला नसला तरी त्यांच्या सेवेचा पुर्वइतिहास बघता धडाकेबाज कारवाईचा समावेश आराखड्यात नक्कीच असणार आहे, यात शंका नाही.