नांदगाव : तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य संख्येमध्ये महिलांनी आघाडी मारली असली तरी महिला सरपंचपदाच्या सोडतीत त्यांची दोन जागांनी पीछेहाट झाली आहे. आरक्षित सरपंचपदासाठी संबंधित संवर्गातील महिलाच निवडून आलेली नसल्याने महिला सरपंचांच्या सत्तेतल्या सहभागाची टक्केवारी ५० टक्क्यावरून घसरून ४८ टक्के झाली आहे.तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींमध्ये एकूण ७८७ सदस्यांपैकी ४५० महिला सदस्य आहेत. म्हणजेच ५७.१८ टक्के महिला सदस्य निवडून आल्या आहेत. येथे पुरुष वर्गाची टक्केवारी ४२.८२ एवढीच दिसून येते. महिला सरपंचपद सोडतीमध्ये ८८ पैकी ४५ ग्रामपंचायतींवर महिलाराज येणार असल्याचे प्राथमिक माहितीत स्पष्ट झाले होते. परंतु तीन गावे अशी निघाली की त्याठिकाणी संबंधित संवर्गातील महिलाच निवडून आलेली नसल्याने नियमाप्रमाणे सरपंचपद त्याच संवर्गातील पुरुषाकडे जाणार आहे.
त्यामुळे ४५ नव्हे तर ४२ ग्रामपंचायतींमध्येच महिला सरपंच होणार आहेत. यामुळे सरपंचपदाचे ५० टक्के महिला आरक्षण आता ४८ टक्के झाले आहे. सदस्य संख्या जास्त असूनही सरपंचपदाच्या वाटणीने महिलांना हुलकावणी देत त्यांचा सत्तेतला वाटा दोन टक्क्यांनी कमी केला आहे.पानेवाडी, वाखारी व हिंगणे देहरे या गावात आरक्षित सरपंचपदासाठी महिला उमेदवारच नसल्याचे स्पष्ट झाल्यावर राजकीय चर्चांना ऊत आला. मात्र, प्रशासनाने मुंबई ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणुकीच्या १९६४ च्या नियमांचा आधार देत महिला नसेल तर त्याच संवर्गातला पुरुष सरपंच होईल असे स्पष्ट केले.अल्पमतातील सरपंचकाही ठिकाणी सरपंच आरक्षणात, अल्पमतात असलेल्या गटांना सरपंचपद मिळाले आहे. अस्तगाव येथे ७ विरुध्द २ सदस्य असून २ संख्या असलेल्या गटाकडे सरपंचपद गेले आहे. असेच वडाळी येथे घडले. ७ विरुद्ध २ असे बलाबल असताना २ च्या गटाकडे सरपंचपद गेले आहे.
भविष्यात ग्रामपंचायतीमध्ये विकासकामांचे ठराव मंजूर करण्यासाठी अल्पमतातला सरपंच विरुध्द बहुमतातले विरोधक यांच्यातली राजकीय सुंदोपसुंदी चर्चेचा विषय होणार आहे. तर अनेक ग्रामपंचायतींमध्ये बहुमताकडे सरपंचपद गेले आहे. त्या संवर्गातला एकच उमेदवार असेल तर सगळे आलबेल होईल. पण नसेल तर चढाओढ अटळ आहे.