नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून नळपाणी पुरवठा योजनेत बिघाड झाल्याने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तसेच धरण परिसरातील वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्याने पाणीपुरवठा करताना अडचणी निर्माण होत आहेत.
कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणी योजनेतून नांदूरशिंगोटे गावाला पाणीपुरवठा केला जातो. भोजापूर धरणातून पाच गावांसाठी पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. नांदूरशिंगोटे येथे मोठी बाजारपेठ तसेच बहुतांश नागरिक हे गावातच वास्तव्य करतात. त्यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी एकमेव योजनेतील पाण्याचा स्रोत आहे. गेल्या आठ वर्षांपासून गावात व वस्तीवर दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. वारंवार योजनेत बिघाड होत असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. गेल्या महिन्यापासून पाणीपुरवठा करताना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असल्याने आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पाणीपुरवठा होत आहे. प्रामुख्याने धरण परिसरात योजनेची विहीर असून पाणी उपसा करताना अडचणी येत असल्याचे पदाधिकारी यांचे म्हणणे आहे. धरणात पाणी आहे तर वेळेवर वीजपुरवठा नाही. वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला तर विद्युतपंप पाणी उपसा करीत नाही, तर काही ठिकाणी जलवाहिनी नादुरुस्त होते. त्यामुळे पाणीपुरवठा करताना अडचणी येत आहेत. परंतु ग्रामस्थांना तसेच व्यावसायिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अन्यत्र स्रोत नसल्याने पाण्यासाठी वणवण होत असून, विकत पाणी घ्यावे लागत आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून गावात पाणीपुरवठा न झाल्याने कृत्रीम पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
-------------------
विद्युतपंप पाण्यात कोसळला
कणकोरीसह पाचगाव प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेची उद्भव विहीर भोजापूर धरणात आहे. विहिरीतून पाणी उपसा करून पाणीपुरवठा केला जातो. धरण परिसरात कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने विद्युतपंप सुरू होण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे दोन दिवस पाण्यास विलंब झाला. वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर विद्युतपंपच विहिरीत खाली कोसळल्याचे समजते. विहिरीत अंदाजे १०० फुटांपर्यंत पाणी असून मोठ्या प्रमाणात गाळसुद्धा आहे. विद्युतपंप काढल्याशिवाय पाणीपुरवठा सुरळीत होणार नसल्याचे चित्र आहे. सुमारे दीड वर्षापूर्वी सदरची योजना दुरुस्तीसाठी ४० लाख रुपये जिल्हा परिषदेने खर्च केला आहे.