नाशिक : राज्यात एकमेव महापालिकेची सत्ता ताब्यात असलेल्या मनसेने गेल्या पंचवीस वर्षांत विविध कामे केली असल्याचा दावा राज ठाकरे हे मुंबईतील सभेत करीत आहेत. तथापि, इतकी ऐतिहासिक कामगिरी मनसेने बजावली असेल तर या पक्षाच्या चाळीसपैकी २९ नगरसेवकांनी रामराम का केला, असा प्रश्न निर्माण होत आहे. योगायोगाने राज यांच्या सभेच्या दोनच दिवस अगोदर हाच प्रश्न त्यांचे पुतणे आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नाशिकमध्ये जाहीर सभेत केला होता.मनसेची नाशिकमध्ये सत्ता आल्यानंतर राज ठाकरे यांनी ज्या स्वरूपाचे नाशिक बदलाचे चित्र दाखवले होते, त्याचे माध्यमांमधून वारंवार स्मरण करून दिल्यानंतर राज यांनी आत्ताशी आठ महिने झाले, वर्ष झाले, असे सांगत होते. त्यानंतर आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर वन खात्याच्या ताब्यातील वनौषधी उद्यानात टाटा उद्योग समूहाच्या टाटा ट्रस्टकडून सीएसआर अॅक्टीव्हीटीतून लेझर शो करून काही प्रमाणात सुशोभिकरण करण्यात आले. होळकर पुलाजवळील वॉटर कर्टन हा कारंजा व एक शंभर फुटी कारंजा आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने केलेले शस्त्रसंग्रहालय तसेच उड्डाणपुलाखालील भितींचे सुशोभिकरण ही कामे निवडणुकीची घोषणा होण्याच्या तोंडावर केली, परंतु ही कामे एकप्रकारचे कॉस्मेटीक चेंजेस आहेत, असे जाणकारांचे म्हणणे आहे. हीच कामे मुंबईतील मतदारांना दाखविण्यात येत आहेत. बाकी साडेचारशे कोटींचे रिंगरोड हे दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थामध्ये होतच असतात, त्याचप्रमाणे यंदाही झाली आहे. अंतर्गत छोटे रस्ते नाशिकमध्ये निवडणुकीच्या तोंडावर करण्याची परंपराच आहे. तसेच केंद्र सरकारच्या नेहरू अभियानातील प्रलंबित मुकणे धरणातील थेट जलवाहिनी योजना आता या योजनेची मुदत संपताना आता नव्या सरकारच्या योजनेतून हाती घेण्यात आली आहे. ज्याचा उल्लेख राज यांच्या मुंबईतील सभेत करण्यात आला आहे. मुंबई येथील सभांमध्ये राज यांच्याकडून या योजनांना उजाळा देण्यात येत असून, नाशिकमध्ये येऊन कामे बघा, असे सांगितले जात आहे. कामे अखेरच्या टप्प्यात झाली असली तरी राज यांच्या म्हणण्यानुसार खरोखरीच इतकी ऐतिहासिक कामे झाली असतील तर मग, निवडणुकीतील निकालाचा अंदाज अगोदरच घेऊन या पक्षाचे २९ नगरसेवक शिवसेना, भाजपा इतकेच नव्हे तर नाशिकमध्ये सध्या हलाखीच्या स्थितीत असलेल्या कॉँग्रेस पक्षामध्ये का दाखल झाले, हा आदित्य ठाकरे यांना पडलेला प्रश्न नाशिककरांनाही पडला आहे.
राज यांच्या दाव्यांबाबत नाशकात आश्चर्य !
By admin | Published: February 16, 2017 1:25 AM