शहरात कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही ताेच तिसऱ्या लाटेची तयारी सुरू करण्यात आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका संभवत असल्याने महापालिकेने त्याची तयारी सुरू केली आहे. बिटको रुग्णालयाात शंभर खाटांचा स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार असल्याचे महापालिकेने घोषित केले होते. त्यानुसार आयुक्त कैलास जाधव यांनी रुग्णालयाच्या तळ मजल्यावर अशाप्रकारचे बालरुग्णालयच सुरू करण्याचे आदेश दिले आहे. नवीन बिटको रुग्णालयात सध्या कोरोनाबाधित रुग्णच दाखल होतात. या रुग्णालयात आता तळमजल्यावर नवीन रुग्ण दाखल करून घेऊ नये आणि बालरुग्णालय तयार करण्याची कार्यवाही सुरू करावी, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
दरम्यान, म्युकरमायकोसिसचादेखील आयुक्तांनी आढावा घेतला. सध्या म्युकरमायकोसिस रुग्णांना देण्यात येणाऱ्या ॲम्फोटेरिसिनच्या नियंत्रणाची जबाबदारी महापालिकेवर आहे. मात्र, म्युकरमायकोसिस रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर हे रुग्णाच्या नातेवाइकांकडे प्रिस्किप्शन सोपवतात. त्यामुळे नातेेवाइकांची अकारण धावपळ होते आणि सर्वच जण गेटवर जमा होतात. त्यामुळे आता या इंजेक्शनचे प्रिस्किप्शन रुग्णांच्या नातेवाइकांकडे देण्यास मनाई करण्याचे आदेशही आयुक्तांनी संबंधितांना दिले आहेत.
इन्फो.. बालरुग्णांबरोबरच पालकांचीही सोय
महापालिकेच्या बालरुग्णालयात दहा वर्षांपर्यंतच्या मुलांच्या उपचाराची सोय असेल अशा मुलांबरोबर त्यांचे पालक विशेषत: आईदेखील थांबू शकेल अशी व्यवस्था करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.