भगुर : शहरातील एकमेव दारणाकाठचे निसर्गरम्य स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाचे शासकीय निधीतून सध्या अतिशय धिम्या गतीने काम सुरू असून, कामाची गती पाहता, ते कधी पुर्ण होणार याची शाश्वती दिली जात नाही. परिणामी शासकीय पातळीवरील या कासवगतीचा लाभ परिसरातील भिकारी व दारूड्यांनी उचलला असून, त्यांनी स्मारकावर ठाण मांडले आहे.
सावरकर जन्मभुमी व दारणा नदीचा नैसर्गिक किनाऱ्यांच्या सौंदर्याचा समन्वय साधून भगुरचे तत्कालीन नगराध्यक्ष पा.भा.करंजकर यांनी कोट्यवधी रुपये खर्चुन भगुर नगर पालिकेच्या वतीने एकमेव सुंदर आकर्षक निसर्गरम्य उद्यान साकारले होते. त्यामुळे भगूरला भेट देण्यासाठी हमखास पर्यटक येत तसेच याठिकाणी अनेकांचे शाहीथाटात शुभ विवाह देखील पार पडत होते. या उद्यानामुळे सावरकरभुमीची शान वाढली होती. मात्र चार ते पाच वर्षात राजकारण बदलले भगुर नगर पालिकेचे या उद्यानाकडे दुर्लक्ष झाले आणि उद्यानाला अवकला आली. उद्यानातील खेळणी, साहित्य गायब झाले. विविध सौंदर्ययुक्त झाडे नष्ट झाली. अलीशान हिरवळीची जागा गाजरगवताने घेतली. उद्यानाचे जंगलात रूपांतर झाले. त्यामुळे दारुड्यांना नवीन अड्डाच तयार झाला. या जागेचा सावरकर जन्मस्थान स्मारकात रुपांतर झाले. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी आवाज उठवून उद्यानाला नव्याने बनविण्याची मागणी केली. त्यामुळे मंध्यतरी नगरपालिकेने नवीन आराखडा तयार केला. परंतु नियोजन नसल्याने त्याचे नुतनीकरण वेळेत पुर्ण होऊ शकले नाही. दरवेळी भगुर नगरपालिकेच्या निवडणूका आल्यानंतर या उद्यानाचा मुद्दा उपस्थित केला जातो आणि निवडणूक निकालानंतर हा मुद्दा पुन्हा विस्मरणात जातो.गेल्या एक वर्षापासून उद्यानाच्या नुतनीकरणाचे काम भगुर नगर पालिकेकडून सुरू करण्यात आले असून, परंतु काम अतिशय धिम्या गतीने केले जात आहे. ठेकेदाराच्या चौकीदाराने याठिकाणी झोपडे बांधून देखभाल ठेवली असली तरी, याठिकाणी दररोज संध्याकाळी दारू पिण्यासाठी अनेक तरुण येवून बसतात तर परिसरातील भिकारी येथे जेवण तयार करून वास्तव्य करतात. घाणीचे साम्राज्य वाढले असून, काम केव्हा पुर्ण होईल याची शाश्वती नाही.यासंदर्भात भगुर पालिका प्रशासन मुख्यलिपिक रमेश राठोड म्हणाले, सावरकर उद्यानाचे काम ऋतुजा कन्ट्रक्शन कंपनीकडे दिले असून, ते लवकरच पुर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. भगुर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अँड विशाल बलकवडे यांनी, भगुरची सत्ताधारी शिवसेना गेल्या २० वर्षापासुन सावरकर उद्यानावर राजकारण करत आहे, परंतु गावात अनेक नागरी समस्या सोडविण्यासाठी अपयशी ठरली असून, उद्यानाचे काम लवकरात लवकर पुर्ण करावे यासाठी आंदोलन करण्यात येईल. असा इशारा त्यांनी दिला. माजी उपनगराध्यक्ष काकासाहेब देशमुख म्हणाले, उद्यानाच्या कामासाठी २ कोटी ६० लाखाची मंजुरी मिळाली आहे. एक वर्षात काम पुर्ण होण्याची शक्यता आहे. प्रभागातील शिवसेना नगरसेविका कविता कैलास यादव म्हणाल्या, सावरकर उद्यानाचे बांधकाम टप्पा पुर्ण होऊन घाटाचे आर. सी. सी. कंपाऊंडचे काम सुरू आहे. लवकरच विविध कारंजे व शुशोभिकरणाचे काम पुर्ण होईल.( फोटो ०२ भगुर, एक, दोन- भगुर सावरकर उद्यान दुरावस्था आणि भिकारी स्थान)छायाचित्रे:- विलास भालेराव भगुर