नाशिक : छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या जागेतील जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामाचे भूमिपूजन येत्या १५ दिवसांत करून या कामाचा लवकरच शुभारंभ करण्यात येणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी सांगितले. कोरोना काळात सर्वाधिक नुकसान क्रीडापटूंचे झाले असून, निदान फिजिकल कॉन्टॅक्ट न येणाऱ्या खेळांना सुरू करण्यास शासनाने परवानगी देण्याची गरज असल्याचा सूर क्रीडा क्षेत्राशी निगडित मान्यवरांनी व्यक्त केला.
‘लोकमत’च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त अंबडच्या मुख्य कार्यालयात झालेल्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी आणि सहायक उपाध्यक्ष बी.बी. चांडक यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना जिल्हा क्रीडा अधिकारी नाईक यांनी सर्व क्रीडा संघटनांच्या मान्यतेनंतर आम्ही शासनाकडे ६६ कोटींच्या अद्ययावत क्रीडा संकुलाचा प्रस्ताव दिला असल्याचे सांगितले. या क्रीडा संकुलात सिंथेटिक ट्रॅकसह मल्टीपर्पज हॉल, इनडोअर गेम्स हॉल, होस्टेल, अंडरग्राऊंड पार्किंग यासह विविध प्रकारचे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले. कोरोनामुळे खऱ्या क्रीडापटूंचा विशिष्ट वयोगटातील अखेरचा प्रयत्न हुकल्याचा सर्वांत मोठा फटका त्यांना सहन करावा लागला आहे. क्रीडा क्षेत्रात ऑनलाइन उपक्रम घेऊन खेळाडूंना फारसा फायदा होत नसल्याने जोपर्यंत प्रत्यक्ष मैदानावर उतरता येत नाही, तोपर्यंत क्रीडापटूंचे नुकसानच होणार असल्याचेही नाईक यांनी नमूद केले. यावेळी बोलताना नाशिक जिमखान्याचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड यांनी पालकांना अद्यापही कोरोनाबाबतची भीती असल्याने ते बालकांना खेळायला पाठवायला फारसे उत्सुक नाहीत. शालेय स्तरावरच खेळ दीड वर्षापासून खंडित झाल्याने गुणवत्ता असलेल्या बालकांचे नुकसान झाले आहे. जेव्हा कोणताही प्रतिभावान खेळाडू एखाद्या खेळात पंधरा वर्षे प्रचंड मेहनत घेतो, त्यानंतरच तो खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि ऑलिम्पिकपर्यंत पात्र होतो. जगभरातले अनेक लहानसहान देश केवळ जिद्दीच्या बळावर ऑलिम्पिकच्या पदकतालिकेत पहिल्या दहामध्ये पोहोचतात. आपल्या देशात जोपर्यंत क्रीडा क्षेत्राला पुरेसे महत्त्व दिले जाणार नाही, तोपर्यंत देशाचा खऱ्या अर्थाने विकास होणार नाही, असेही छाजेड यांनी नमूद केले. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, अविनाश खैरनार, अभिषेक छाजेड आदी पदाधिकारी उपस्थित होते.