लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किसान क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या आहेत. शेतकरी आंदोलन संपल्याने आपले काय होणार या भावनेनेच काही राजकीय पक्षाचे पुढारी संप सुरूच ठेवून आपली पोळी भाजण्याचे काम करीत असल्याचा आरोप जलसंपदामंत्री तथा जिल्ह्णाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना केला.शेतकरी संपाची सुरुवात पुणतांबा येथून झाली होती. तेथील किसान क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांचे १ आॅक्टोबरपर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात तत्काळ कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे. एका महिन्याच्या आत दुधाचे दर वाढविले जाणार आहेत. तसेच सरकारने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. जवळपास शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्यानेच शेतकरी संप मागे घेण्यात आल्याची घोषणा केली आहे. नाशिकला मात्र काही राजकीय पुढाऱ्यांनी संपात शेतकरी म्हणून सहभाग घेतला असून, ते आम्हाला संप मागे घेण्याचा निर्णय मान्य नसल्याचे सांगत आहेत. मात्र हे खरे शेतकरी नसून ते सर्व राजकीय पक्षाचे पुढारी आहेत. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आपण स्थानिक आमदार व खासदारांना शेतकऱ्यांच्या चर्चेसाठी पाठविले होते. मात्र तेथे काही स्थानिक पुढारीच शेतकरी असल्याचे सांगून संप मागे न घेण्याचे सांगत होते. वस्तुत: आपणही शेतकऱ्यांच्या चर्चेसाठी तयार होतो. शेतकरी संपाची सुरुवात ज्या पुणतांबा येथून झाली होती त्यांनी संप मागे घेतला असून, आता सर्व शेतकऱ्यांनी त्यांचा माल विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये आणावा, त्यांना पोलीस बंदोबस्त हवा असल्यास प्रशासन मदत करेल, असे आवाहन गिरीश महाजन यांनी केले. नाशिकसह ज्या काही ठिकाणी संप सुरू ठेवण्याचा प्रकार घडत आहे, त्यात सर्व राजकीय पक्षांचे पुढारी घुसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. याप्रसंगी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, उपमहापौर प्रथमेश गिते, वसंत गिते, लक्ष्मण सावजी, सुनील बागुल, सुनील खोडे, प्रशांत जाधव आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या आडून राजकीय पोळी भाजण्याचे काम : गिरीश महाजन
By admin | Published: June 04, 2017 2:11 AM