माथाडी कामगारांच्या बंदमुळे नाशिकरोड येथील मालधक्का येथे कामकाजावर काहीसा परिणाम झाला. या ठिकाणी १५५ माथाडी कामगार असून, त्यांनी काम बंद केल्याने कामकाजावर थोडाफार परिणाम झाला. सध्या धान्याचा रेल्वे रॅक नसल्याने परिणाम जाणवला नसला तरी जिल्ह्यातील बाजार समित्या, धान्य गोदामे या ठिकाणी काम करणाऱ्या माथाडी कामगारांच्या बंदमुळे कामकाज विस्कळीत झाले. जिल्ह्यात नाशिकरोड मालधक्का सर्वात मोठा असून, मनमाड येथील एफसीआयचे गोदाम आणि जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कामकाज काही प्रमाणात प्रभावित झाले.
महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस नरेंद्र पाटील, कार्याध्यक्ष शशिकांत शिंदे, गुलाबराव जगताप यांनी लाक्षणिक बंदची हाक दिली होती. त्यामुळे जिल्ह्यातील माथाडी कामगारांनी कामबंद आंदोलन केल्यामुळे मालधक्का तसेच बाजार समितीतील कामकाज ठप्प झाले होते. माथाडी कामगारांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयामध्ये अनेकदा बैठका झाल्या आहेत. त्यामध्ये झालेल्या निर्णयांची मात्र अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. कै. अण्णासाहेब पाटील यांनी तयार केलेला माथाडी कायदा मोडीत काढण्याचा प्रयत्न शासकीय पातळीवर सुरू होत असल्याचा आरेाप करीत माथाडी कामगारांनी कामबंद आंदोलन केले.
---इन्फो--
अशा आहेत मागण्या
१) माथाडी कामगारांचा समावेश अत्यावशक सेवेत करावा.
२) काेरोनामुळे मृत माथाडी कामगारांच्या वारसांना आर्थिक मदत मिळावी.
३) माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करणे,
३) लेव्हीच्या प्रश्नाची सोडवणूक करावी.
४) माथाडी मंडळात कामगारांच्या मुलांना संधी मिळावी.
५) हक्काच्या कामासाठी पोलीस संरक्षण मिळावे.
६) कामात वारंवार होणारी गुंडागर्दी थांबविण्यासाठी उपाययोजना करावी.
७) मंडळात पूर्णवेळ चेअरमन, सेक्रेटरी नेमणुका कराव्यात.
८) रेल्वे यार्डात माथाडी कामगारांना विश्रांतीगृह सुविधा मिळावी.