नाशिक : मागील आठ महिन्यांपासून रोजगार हमीच्या कामाकडे पाठ फिरविलेल्या मजुरांनी आता कामावर हजेरी लावणे सुरू केले आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात २८ हजार मजूर रुजू झाले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत रोजगारांची उपलब्ध संधी आणि त्यानंतर अतिवृष्टीमुळे कामावर मजुरीच्या उपस्थितीचा परिणाम झाला होता. जिल्ह्यात घरकुलांची कामे सुरू झाल्याने आगामी काळात मजुरांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील अतिवृष्टीचा फटका रोजगार हमीच्या कामांनादेखील बसला. त्यानंतरच्या काळात निवडणुकांमुळे मजुरांना कामे मिळू लागल्याने रोजगार हमीच्या कामावर मजूर मिळत नसल्याची परिस्थिती होती. आता मजूर कामावर परतले असून, फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत मजुरांची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्ह्यात सद्य:स्थितीत वृक्षलागवड, विहीर खोदकाम, पोल्ट्री शेड, शौचालये आदींची किरकोळ स्वरूपातील कामे सुरू असली तरी घरकुलांच्या कामाने मजुरांच्या हाताला काम लागले आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर घरकुलांच्या कामाला प्राधान्य देण्यात आले असल्याने एक हजाराच्या जवळपास घरकुलांची कामे सुरू झाली आहेत. या कामांवर २३,४१२ मजूर सध्या काम करीत आहेत. येत्या महिन्यात घरकुलांची आणखी कामे सुरू होणार असल्याने मजुरांच्या संख्येतदेखील वाढ होणार आहे.फळबागांची कामेदेखील वाढली असून, जवळपास आठ तालुक्यांमध्ये रोजगार हमीच्या माध्यमातून फळबाग लागवडीसाठी मजूर कामे करीत आहेत. जिल्ह्णात ४५ ठिकाणी फळबागांची कामे सुरू झाली असून, यावर ११७६ इतके मजूर काम करीत आहेत. फळबाग आणि घरकुलांच्या कामावर काम करण्यासाठी ग्रामरोजगार सेवकाकडे नोंदणी होत असल्यामुळे या दोन्ही कामांवर मजुरांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. जिल्ह्णात वृक्षलागवडीच्या ७९ कामांवर १५३४ मजूर, विहीर खोदकामाच्या ५६ कामांवर १७३६ तर कॅटलशेड उभारणीची १३ कामे सुरू आहेत. या कामावर ४०८ मजूर सद्यस्थितीत काम करीत आहेत. फेब्रुवारीत फळबागांच्या कामालादेखील वेग येणार असल्याने या कामांवरही मजुरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.योजनेच्या यंत्रणेची कामेरोजगार हमीच्या माध्यमातून मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी ग्रामपंचायत आणि यंत्रणास्तरावर अनेक कामे घेतली जातात. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या कामांचा समावेश अधिक आहे.स्वच्छतेपासून ते बांधकामापर्यंतची कामे केली जातात. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लघुपाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम यातून रोजगार हमीची कामे उपलब्ध होत आहेत.जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडूनही कामे उपलब्ध होतात. खरिपामध्ये रोजगार हमीच्या कामाची मागणी नसली तरी आता रोजगार हमीच्या कामांची मागणी नोंदविलेली आहे.१२०० कामे : जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या सुमारे १२०० कामांवर सद्य:स्थितीत २८,६०३ मजूर काम करीत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये जिल्ह्यातील कामावर रोजगार हमीच्या कामाकडे मजुरांनी पाठ फिरविली होती.
जिल्ह्यात तीस हजार मजुरांच्या हाताला काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 12:30 AM
नाशिक : मागील आठ महिन्यांपासून रोजगार हमीच्या कामाकडे पाठ फिरविलेल्या मजुरांनी आता कामावर हजेरी लावणे सुरू केले आहे. सद्य:स्थितीत ...
ठळक मुद्देरोजगार हमी योजनेच्या कामावर मजूर परतले : निवडणूक काळात मोठ्या प्रमाणावर रोडावली होती संख्या