नाशिक : कोरोनाने माणसांमधील अंतर दूर केले खरे; पण ‘वर्क फ्रॉम होम’ या संकल्पनेमुळे व्यवसाय, उद्योगांचे कार्यक्षेत्र बदलून आयटी क्षेत्रातही रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्याचे मत वैभव प्लेसमेंटचे संचालक श्रीधर व्यवहारे यांनी व्यक्त केले.
डिजिटल वसंत व्याख्यानमालेत ‘रोजगाराच्या नव्या संधी’ या विषयावर त्यांनी तिसावे पुष्प गुंफले. स्व. चित्रकार शिवाजी तुपे स्मृती व्याख्यानात बोलताना व्यवहारे यांनी कोरोनापूर्वी आणि नंतर उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात झालेले बदल यावर मतप्रदर्शन केले. पूर्वी १० टक्के सरकारी नोकऱ्या होत्या, तर नव्वद टक्के नोकऱ्या खासगी उद्योग व्यवसायावर अवलंबून होत्या. बँकिंग, इन्शुरन्स, यावर सरकारचे नियंत्रण होते, सरकारी क्षेत्रात समाजाभिमुख काम असल्याने प्रत्यक्ष लाभ कमी होता; परंतु खासगी क्षेत्रावरच ९० टक्के रोजगार उपलब्ध होता. कोरोनाने सारे समीकरण बिघडले आणि ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना उदयास आल्याचे व्यवहारे यांनी स्पष्ट केले.
सरकारनेच या नव्या संकल्पनेचा स्वीकार केल्याने खासगी क्षेत्रात ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना तत्काळ रुजली सद्यस्थितीत फक्त १५ टक्के लोक कामावर येत असून, उर्वरित लोक घरूनच कामकाज करताहेत. काम झाले पाहिजे या मानसिकतेतून ‘वर्क फ्रॉम होम’ या प्रक्रियेमुळे कामा विभागणी झाली आणि छोटे-छोटे उद्योग उभे राहिले आहेत. कमीत कमी मनुष्यबळ वापरून उत्पादन होत असल्याने व्यवसायाच्या संधी आपोआपच निर्माण होत गेल्या. उत्पादन निर्मिती आणि त्यासाठी साहाय्यभूत ठरणाऱ्या प्रक्रियेचे विकेंद्रीकरण झाल्याने आयटी क्षेत्राला झळाळी मिळाल्याचे व्यवहारे यांनी सांगितले.
अशा वातावरणात आरोग्य या घटकांशी जे उद्योग निगडित आहेत. अर्थात रुग्णालये, इन्शुरन्स, फार्मासिस्ट इत्यादी ठिकाणी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. या ठिकाणी सरकारही प्राधान्य देत आहे. ट्रॅव्हल व्यवसायाला मात्र या परिस्थितीचा मोठा फटका बसलाय, तर हॉटेल्सने घरपोच सेवा देताना रोजगाराच्या नव्या संधी देऊ केल्या आहेत. भविष्यातील बदल लक्षात घेऊन भावी पिढीने तंत्रज्ञानाशी सांगड घालण्याची गरज आहे. परदेशात आणि भारतातही अनेक उद्योगांनी रोबोटच्या माध्यमातून उद्योगांना गती दिलीय, त्यामुळे भावी पिढीने ही नॅनो टेक्नॉलॉजी आत्मसात केल्यास रोजगाराच्या दृष्टीने ही एक संधी असेल, अभ्यासक्रम निवडताना याचा विचार व्हावा असेही व्यवहारे यांनी नमूद केले. मालेच्या चिटणीस संगीता बाफना यांनी परिचय करून दिला, तर अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी आभार मानले.
इन्फो
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या डिजिटल वसंत व्याख्यानमालेचा समारोप सोमवारी ‘नमन’या सांगीतिक कार्यक्रमातून होत आहे. अमोल पाळेकर प्रस्तुत ‘नमन’ या भावमधुर गाण्यांचा कार्यक्रम हा आदर्श शिक्षक, ज्येष्ठ तबलावादक स्व. नवीन तांबट आणि ध्वनी संयोजक अरविंद म्हसाने यांना समर्पित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमात गायक मीना परुळेकर-निकम, विद्या कुलकर्णी, आनंद अत्रे यांच्या सुमधुर स्वरांना सुरांची साथ देतील.
फोट
३० व्यवहारे