नाशिक : भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे कामकाज ठप्प झाले असून, जिल्ह्यातील सुमारे बाराशे कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेने १६ जानेवारीपासून कामबंद आंदोलन सुरू केलेले असून, सरकारने त्याची दखल घेतलेली नाही. यामुळे राज्य पातळीवर मंगळवारपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. भूमी अभिलेख विभागास तांत्रिक दर्जा देऊन तांत्रिक वेतनश्रेणी लागू करावी, नागरीकरणाच्या प्रमाणामध्ये नगर भूमापनाची कार्यालये सुरू करावीत, राज्याच्या पूर्णमोजणी प्रकल्पासाठी नवीन आस्थापना मंजूर करावी, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी नवीन नगर भूमापन कार्यालये सुरू करावीत, मोजणी प्रकरणांची संख्या दरमहा १५ वरून १२ करावी, क संवर्गातून ब संवर्गात पदोन्नती देताना विभागांतर्गत द्यावी, बदल्या करताना जिल्ह्यात पदे रिक्त असताना अन्यत्र बदल्या करू नयेत आदि मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या संपामुळे जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले असून, त्यातून मोजणी, नोंदी, वन जमिनीची मोजणी आदि कामे ठप्प झाली आहेत. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष मिलिंद जगताप, अजय जाधव, विलास दाणी, श्रीराम सोनवणे, दौलत समशेर, मनोज संधान, श्रीकांत परदेशी, प्रशांत पंडित, श्रीमती अश्विनी धिवरे, आरिका मनियार, ज्योती जाधी आदि सहभागी झाले आहेत.
भूमी अभिलेखचे कामकाज ठप्पदु
By admin | Published: January 28, 2015 11:27 PM