मालेगाव : शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी २१ कोटी ७२ लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाचे काम गेल्या ३ वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. या कामामुळे नागरिकांना व वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या वर्षात हा प्रकल्प पूर्णत्वास येणे गरजेचे होते; मात्र आता नववर्षातच मालेगावकरांसाठी उड्डाण पुलाचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. राजकीय कुरघोडी व उड्डाण पुलाच्या वाढीव कामाच्या खोडीमुळे काम संथगतीने सुरू आहे.
उड्डाण पुलाच्या वाढीव कामाला शासनाने मान्यता द्यावी यासाठी प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आला आहे. शासनाच्या लालफितीत प्रस्ताव अडकल्याने मालेगावकरांना उड्डाणपुलाची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. शहराच्या पूर्व भागातील उपकार सिनेमागृह ते सखावत हॉटेलपर्यंत उड्डाणपुलाचे काम सध्या रखडत रखडत सुरू आहे. आत्तापर्यंत केवळ ६० टक्के काम झाले आहे. राज्य शासनाने या कामासाठी २१ कोटी ७२ लाख रुपये मंजूर केले आहेत. २५ सप्टेंबर २०१७ रोजी उड्डाण पुलाचा कार्यारंभ आदेश देऊन ठेकेदाराला दोन वर्षांची मुदत देण्यात आली होती. २४ सप्टेंबर २०१९ रोजी पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र ठेकेदाराने काम पूर्ण न केल्याने महापालिकेने पुन्हा ठेकेदाराला ६ महिन्यांची म्हणजे मार्च २०२० पर्यंतची मुदतवाढ दिली होती; मात्र सध्या मुदतवाढीची मर्यादा संपून ९ महिने उलटले आहेत. तरी देखील काम झाले नाही. लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाने लक्ष घालून आगामी वर्षात पूल वाहतुकीसाठी खुला करावा, अशी अपेक्षा मालेगावकरांकडून केली जात आहे.शहराच्या वैभवात भर टाकणारा मोठा प्रकल्प गेल्या काही वर्षापासून रखडला आहे. उड्डाणपुलाच्या कामामुळे शहरातील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. तसेच नवीन बसस्थानकात येणाऱ्या व जाणाऱ्या बसला मोकळा रस्ता उपलब्ध होणार आहे; मात्र रखडलेल्या या प्रकल्पामुळे मालेगावकरांच्या पदरी निराशा पडत आहे. वाहतूक कोंडीच्या व धुळीच्या समस्यांना नागरिक वैतागले आहेत.