नाशिक : नाशिक महापालिकेतील कर्मचारी आणि अधिका-यांच्या प्रलंबित काही मागण्यांबाबत धोरणात्मक निर्णय होण्यासाठी कालावधी लागणार असल्याने प्रशासनाच्या विनंतीनंतर १७ जानेवारीपासून करण्यात येणारे कामबंद आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेनेचे अध्यक्ष व नगरसेवक प्रविण तिदमे यांनी दिली.महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी(दि.९) सर्व खाते प्रमुख आणि म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेनेच्या पदाधिका-यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेतील कर्मचारी, अधिकारी, सफाई कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्या, मयत कामगारांच्या वारसांना अनुकंपातत्वावर मनपा सेवेत घेणे, सफाई कामगारांना मालकी हक्काने घर मिळावे, वैद्यकिय भत्ता, वैद्यकिय विमा अशा विविध मागण्यांबाबत कार्यवाही न झाल्यास १७ जानेवारीपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेनेने पालिका प्रशासनाला दिला होता. या मागण्यांबाबत २९ डिसेंबरला पालिका प्रशासनाने कर्मचारी सेनेसोबत बैठक घेऊन बहुतांश मागण्या मान्य केल्या होत्या. उर्वरित मागण्यांबाबत मंगळवारी पुन्हा बैठक झाली. शासन आदेशानुसार खुल्या प्रवर्गातील सर्व रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यास आयुक्तांनी मंजुरी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आवास योजनेंतर्गत सफाई कर्मचारी रहात असलेली घरे मालकी हक्काने त्यांचे नावावर करण्याबाबत मंजुरी देण्यात आली. शहर अभियंत्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला जलद कार्यवाही करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले. घंटागाडी, साफसफाई, पेस्ट कंट्रोलचे ठेके न देता मनपाने स्वत: प्रकल्प राबवावे, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना किमान वेतन दरानुसार वेतन द्यावे, भविष्यनिर्वाह निधी चालू करणे, सुरक्षा रक्षक आणि वाहनचालकांच्या रिक्त जागा आऊट सोर्सिंगने न भरता या जागा वेतनश्रेणी किंवा रोजंदारीने भरती करावे, फाळके स्मारकातील कामगारांचे थकीत वेतन त्वरित अदा करावे या काही मागण्यांबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार असल्याने संबंधित खाते प्रमुखांनी प्रस्ताव तयार करून महासभेवर ठेवण्याचे आदेश आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिले.प्रशासनाचे विनंती पत्रबहुतांश मागण्या मान्य झाल्या असून उर्वरित मागण्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यास कालावधी लागणार असल्याने म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेनेने १७ जानेवारी पासून कामबंद आंदोलन करू नये असे विनंती पत्र अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी कर्मचारी सेनेला दिले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन दि. १७ जानेवारी पासून करण्यात येणारे कामबंद आंदोलन स्थगित करण्यात येत आहे.- प्रविण तिदमे, अध्यक्ष, कामगार सेना
नाशिक म्युनिसिपल कर्मचा-यांचे काम बंद आंदोलन स्थगित, २५ मागण्यांसाठी दिला होता इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 8:51 PM
आयुक्तांसमवेत बैठक : बव्हंशी मागण्या मान्य झाल्याने निर्णय
ठळक मुद्दे महापालिकेतील कर्मचारी आणि अधिका-यांच्या प्रलंबित काही मागण्यांबाबत धोरणात्मक निर्णय होण्यासाठी कालावधी लागणार २९ डिसेंबरला पालिका प्रशासनाने कर्मचारी सेनेसोबत बैठक घेऊन बहुतांश मागण्या मान्य केल्या होत्या