सातपूर : जिल्ह्यातील उद्योजकांचे नेतृत्व करणाऱ्या नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) या उद्योजक संघटनेवर आठवड्याभरापूर्वी गुरुवारी (दि.१७) प्रशासकीय मंडळाने लावलेले सील बुधवारी दुपारी उघडण्यात आले. दरम्यान, सिन्नर येथील निमा कार्यालय अद्याप बंदच आहे. धर्मादाय सहआयुक्त यांच्या आदेशाने पुढील निर्णय येईपर्यंत केवळ दैनंदिन कामकाज करण्यात येणार असल्याचे प्रशासकीय मंडळाने सांगितले.
निमाच्या निवडणुकीवरून सुरु असलेला वाद थेट न्यायालय व त्यानंतर धर्मादाय आयुक्त कार्यालयात पोहोचला होता. धर्मादाय सहआयुक्त जयसिंग झपाटे यांनी गुरुवारी निमावर तीन सदस्यीय (सहायक धर्मादाय आयुक्त राम लिपटे,धर्मादाय निरीक्षक पंडितराव झाडे, धुळ्याचे ॲड. देवेंद्र शिरोडे ) समिती नेमण्याचा निकाल दिला. या निकालानुसार समितीने गुरुवारीच सायंकाळी निमात येऊन दप्तर ताब्यात घेतले. शिवाय निमातील सर्व कपाटे कुलूपबंद करून निमाच्या मुख्य द्वारालादेखील सील करून चावी घेऊन निघून गेले होते. दरम्यान यावर्षी निमा आपले सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करणार होते. मात्र दोन गटात सुरू असलेला वाद व आपापल्या परीने सुरू असलेले राजकारण यामुळे सध्या निमा या उद्योजक संघटनेची प्रतिमा मलिन झाली आहे. दरम्यान, बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास प्रशासकीय मंडळाने निमाचे सील उघडत निमाचा कारभार हाती घेतला. पुढील निर्णय येईपर्यंत निमाचे दैनंदिन प्रशासकीय कामकाज सुरु करण्यात आले असल्याचे प्रशासक मंडळाने सांगितले. तर उद्योजकांचे प्रश्न वजा समस्या मांडण्यासाठी प्रशासकीय मंडळाने निमा सदस्यांना (उद्योजकांना) प्रवेश दिला आहे. मात्र न्यायालयीन प्रक्रियेत असणाऱ्या निमा सदस्यांना प्रवेश नाकरण्यात आला असून आजी-माजी कार्यकारी मंडळाला निमापासून दूरच राहावे लागणार आहे.