नाशिक : घसा खवखवला तरी शंकेची पाल मनात चुकचुकते आणि कोरोनाची लागण झाल्याचा संशय मनात येतो. अशा भीतीच्या सावटाखाली प्रत्येक माणूस असताना प्रत्यक्षात कोरोना कक्षात कोरोना रुग्णांची शुश्रूषा करणाºया परिचारिकांची सेवा देशसेवेसारखी असल्याचे सांगून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.जागतिक परिचारिका दिनानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व परिचारिकांचे काम आरोग्य सेवेत अत्यंत महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात कोरोना कक्षात काम करताना कोरोना रुग्णांची या परिचारिका काळजी घेतात, त्यांचे मनोबलही वाढवितात. जिल्ह्यातील ६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यामध्ये त्यांचा वाटा मोलाचा आहे, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी म्हटलेआहे. आरोग्यसेवक डॉक्टरांबरोबरच परिचारिकांचे कामही तितकेच महत्त्वपूर्ण असून त्यांच्यामुळे आपण कोरोनाशी यशस्वी लढा देत आहोत. कोरोनाच्या लढ्यातील परिचारिकांचे काम नेहमीच लक्षात राहील, असेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी म्हटले.
परिचारिकांचे कार्य देशसेवेसारखेच; जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 10:04 PM