नाशिक : दुकाने सुरू झाल्याने शहरातील विविध ऑटोमोबाईल दुकानांसमोर वाहन दुरुस्तीची कामे करणाऱ्या छोट्या कारागिरांना आता रोजगार मिळू लागला असल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊनमुळे दुकाने बंद असल्याने या कारागिरांना रोजगार मिळणे मुश्कील झाले होते.
वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त
नाशिक : रस्त्यांवर खोदलेल्या खड्ड्यांमुळे शहरातील विविध भागांमध्ये वाहतूक कोंडी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. सदर कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना महापालिकेने संबंधितांना द्याव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.
सफरचंदाची आवक मंदावली
नाशिक : नाशिक बाजार समितीमध्ये आंब्याची आवक टिकून असून केशर आंब्याला चांगला दर मिळत आहे. घाऊक बाजारात ६० पासून १०० रुपये किलोपर्यंत केशर अंब्याचा दर आहे. इतर फळांनाही चांगली मागणी आहे. मात्र, आवक कमी असल्याचे दिसून येते. सफरचंदाची आवक खूपच मंदावली आहे.
डिझेल वाढल्याने व्यवसाय अडचणीत
नाशिक : डिझेलचे दर वाढले असल्याने टुरिस्ट टॅक्सीचालकांना व्यावसाय करणे जिकिरीचे झाले आहे. डिझेल वाढले तरी प्रवासी भाडे वाढवून देण्यास तयार नसल्याने या व्यावसायिकांना व्यवसाय करणे परवडेनासे झाले आहे. त्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
उद्यानांमध्ये बालगोपालांना वावर
नाशिक : शहरातीलकाही उद्याने सुरू झाल्याने या परिसरात बालगोपालांचा वावर वाढला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वातावरणही प्रसन्न वाटू लागले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उद्याने बंद असल्यामुळे बालगोपालांना त्याचा आनंद घेता येत नव्हता. आता उद्याने गर्दीने फुलू लागली आहेत.
इतर साथींच्या आजारांमध्ये वाढ
नाशिक : कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी इतर साथींच्या आजारांनी डोके वर काढले आहेत. त्यामुळे विविध परिसरातील डॉक्टरांच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. नागरिकांनी अधिकाधिक काळजी घेत पाणी उकळून प्यावे, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.
शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा
नाशिक : मान्सूनपूर्व पाऊस पडल्यानंतर मृगाच्या पावसाने मात्र हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात अद्याप पेरणीला सुरुवात झालेली नसली तरी ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे त्यांनी पेरणीस सुरुवात केली आहे. अनेक शेतकऱ्यांना मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.