सिडको : आश्विननगर येथील राजे संभाजी क्रीडा संकुलात सुरू करण्यात आलेले नूतनीकरणाचे काम गेल्या सहा ते सात महिन्यांपासून बंद असल्याने क्रीडांगणाचे काम रखडलेल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
महापालिकेच्या सिडको बांधकाम विभागाच्या वतीने सिडकोतील प्रभाग क्रमांक २७ मधील राजे संभाजी क्रीडा संकुल येथे सुमारे सहा कोटी रुपये खर्च करून नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. गेल्या सप्टेंबर २०१९ मध्ये या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. या कामासाठी सुमारे सहा कोटी निधी मंजूर करण्यात आला असून, यात राजे संभाजी क्रीडा संकुलात स्पोर्ट अकॅडमी, ट्रेनिंग सेंटर, खेळाडूसाठी होस्टेल, बिल्डिंग बांधणे, सिटिंग गॅलरीवर छत टाकणे याबरोबरच बास्केटबॉल लॉन टेनिस ग्राउंड तयार करण्यासाठी इमोरटल इन्फ्रास्ट्रक्चर यांना काम देण्यात आले आहे. या कामांपैकी बहुतांशी काम अद्यापही प्रलंबितच आहे. महापालिकेने या कामांसाठी संबंधित ठेकेदारास दिलेला वर्षभराचा कालावधी नुकताच पूर्ण आला आहे. परंतु कोविड महामारीमुळे गेल्या सात महिन्यांपासून हे काम पूर्णतः बंद असल्याने ठेकेदारासदेखील या कामासाठी मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले आहे; परंतु सद्य:स्थितीत संभाजी क्रीडा संकुलातील नूतनीकरणाचे काम पूर्ण रखडलेले आहे. या कामामुळे संभाजी क्रीडा संकुलामधील जॉगिंग ट्रॅकची संपूर्ण दुरवस्था झाली आहे. खेळाचे मैदान संपूर्ण खराब झालेले आहे. धूळ मोठ्या प्रमाणात साचलेली असून, मैदानातच मोठे दगड असल्याने खेळाडूंना याचा त्रास सहन करावा लागत आहे .संबंधित ठेकेदाराने नंतर कुठलेही काम सुरू न केल्याने संपूर्ण स्टेडियमला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे.
चौकट===
राजे संभाजी क्रीडा संकुलातील जॉगिंग ट्रॅक पूर्णतः खराब झाला असून यावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. नूतनीकरणाचे काम रखडल्याने या ठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे खेळाच्या मैदानात मोठ्या प्रमाणात दगड साचलेले आहे. यामुळे क्रीडाप्रेमींना त्रास होत आहे.
(फोटो २२ क्रिडा)