ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील अंतापूर-द्वारकाधीश-दसवेल दरम्यानच्या रस्त्यावर सुरू असलेल्या फरशीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून, कामासाठी वापरण्यात आलेल्या पाइपला भगदाड पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. सदर कामाची चौकशी करून कामाचा दर्जा वाढवावा, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी केली आहे.अंतापूर-दसवेल मार्गावर द्वारकाधीश साखर कारखाना आहे, सध्या कारखान्याचे ऊस गाळप सुरू आहे. यामुळे या रस्त्यावरून उसाची वाहतूक सुरू असतानाच मार्गावरील दोन मोरींच्या कामास प्रारंभ केला असून, सदर काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याने या ठिकाणी अपघात होऊन मोठी दुर्घटना घडू शकते. पहिल्या मोरीच्या पाइपास पहिल्याच दिवशी भगदाड पडले, यावरून कामाचा दर्जा लक्षात येतो. मोरी बांधकाम करताना खालून बांधकाम करून पाइप बसवावे लागतात; मात्र सरळ जमिनीत पाइप टाकून वरून बांधकामाचा करण्याचा प्रयत्न जागरूक ग्रामस्थांमुळे समोर आला. दुसऱ्या मोरीच्या कामातही हीच परिस्थिती आहे. या ठिकाणी असलेल्या नाल्यात मोरी मोठ्या पावसात बुजली जाईल अशी परीस्थिती आहे. सदर कामांची चौकशी होऊन मोरी कामांचा दर्जा चांगल्या प्रतीचा व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. विशेष म्हणजे हे काम सुरू असताना बागलाण पंचायत समितीचे बांधकाम विभाग व या भागाचे लोकप्रतिनिधी अनभिज्ञ असल्याचे समजते. दरम्यान, वरील कामाबाबत तक्र ारी झाल्यानंतर पंचायत समितीचे उपअभियंता सी. पी. खैरनार, शाखा अभियंता एस. डी. शिवदे यांनी कामाला भेट दिल्यानंतर पाइपास पडलेल्या भगदाडास मलमपट्टी झाली.-------------------------------ताहाराबाद जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामांच्या दर्जाबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही. प्रशासनाने ठेकेदारांना पाठीशी न घालता जनतेच्या तक्र ारींची योग्य दखल घ्यावी.- रेखा पवार, सदस्य, जिल्हा परिषद-------------------अंतापूर येथे दावल मलिक बाबा यांचे देवस्थान आहे. प्रत्येक गुरु वारी येथे यात्रा भरते, हजारो भाविक यात्रेला येतात. शेजारी जागतिक कीर्तीचे जैन धर्मीयांचे मांगीतुंगी येथे देवस्थान आहे. भाविक वर्गाला दोन्ही देवस्थानास जाण्यास हा मार्ग असल्याने या रस्त्याचे काम चांगल्या प्रतीचे व्हावे. - सुनील गवळी, माजी उपसरपंच, अंतापूर--------------------वरील कामांच्या तक्र ारींची दखल घेतली असून, चांगल्या प्रतीचे काम होण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.- सी. पी. खैरनार, उपअभियंता, पंचायत समिती, सटाणा
अंतापूर-दसवेल रस्त्यावरील फरशीचे काम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 1:20 PM