निफाड : गावचा विकास करणे हे सरपंचाचे काम आहे यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती असायला हवी असे प्रतिपादन स्मार्ट व्हिलेजचे प्रणेते व आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले. शारदीय व्याख्यानमाला कार्यकारी समितीच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने निफाड येथे रविराज मंगल कार्यालयात आयोजित शारदीय व्याख्यानमालेचे तीसरे पुष्प भास्करराव पेरे पाटील यांनी ‘स्मार्ट व्हिलेज काळाची गरज’ या विषयावर गुंफले. व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पाचे प्रायोजक अनिल कुंदे , मनोज आहेरराव होते.यावेळी भास्करराव पेरे म्हणाले, प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज करायचे असेल तर यासाठी गावातील नागरीकांचे सहकार्य अपेक्षीत असते , मात्र नागरीकांना प्रेमाने हाताळणारे सत्ताधारी सुद्धा तेवढेच महत्वाचे असतात. सरपंचांनी आमदार , खासदार यांच्या भरवशावर न बसता स्वत: गावच्या विकासासाठी प्रामाणीकपणे झटल्यास त्यांचे गाव स्मार्ट व्हिलेज झाल्याशिवाय राहणार नाही. गावातील सत्ताधाºयांनी जनतेशी चांगले संबध ठेऊन काम करावे . त्यामुळे गावच्या विकासासाठी जनताही सहकार्य करते. जर गावागावात शौचालय, गटारी , पिण्याचे पाणी , वृक्षारोपण , या सुविधा उपलब्ध झाल्या तर ते गाव नक्कीच विकास करू शकते. प्रत्येक नागरिकाने गावच्या व स्वत:च्या स्वच्छतेची काळजी घेतल्यास देशाच्या बाबतीत ही बाब प्रगतीची ठरेल. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने घराजवळ झाडे लावली पाहीजे. महिलांना सन्मानाची वागणुक द्या महिला जे कष्ट करतात त्याची जाणीव ठेवा असेही त्यांनी सांगितले. प्रास्तविक शिवाजी ढेपले यांनी केले. आभार प्रदर्शन अनिल कुंदे यांनी केले . सूत्रसंचलन सुनील कुमावत यांनी केले.