सिन्नर/वडझिरे : आयुष्यात भौतिक सुविधा महत्त्वाच्या आहेत. पण या सुविधा मिळाल्या म्हणजे विकास झाला असे नाही. झालेले काम प्रत्यक्षात दिसले पाहिजे, ते नावापुरते मर्यादित नसावे, असे प्रतिपादन आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले. पंचायत समितीचे गटनेते उदय सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील मोह व चिंचोली येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी आमदार वाजे बोलत होते. व्यासपीठावर नवनिर्वाचित नगराध्यक्ष किरण डगळे, जिल्हा परिषद सदस्य अर्जुन बर्डे, हेमंत वाजे, शैलेश नाईक, बाळू उगले, गोविंद लोखंडे, पंकज मोरे, सोमनाथ पावसे, श्रीकांत जाधव, संजय सानप, सुदाम बोडके, खरेदी विक्री संघाचे संचालक कचरू गंधास यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते मोह व चिंचोली येथे सुमारे चार कोटी रुपयांच्या निधीतून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. वाजे यांच्या हस्ते यावेळी चिंचोली येथे तलाठी कार्यालय ते वडगाव रस्ता डांबरीकरण व कॉँक्रिटीकरण, व्यायामशाळा बांधकाम, समाजमंदिर बांधकाम, प्राथमिक आरोग्य केंद्रास संरक्षण भिंत, अंगणवाडी इमारतीचे बांधकाम, जलयुक्त शिवार योजने अंतर्गत सीमेंट प्लग बंधारे बांधणे, तर मोह येथे गटार बांधकाम, इमारत नूतनीकरण, चिंचोली फाटा ते मोह रस्ता कॉँक्रिटीकरण, दलितवस्तीत सौरदीप बसविणे आदिंसह विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडले. यावेळी गोविंद लोखंडे, नगराध्यक्ष किरण डगळे यांनी मनोगत व्यक्त केले.
काम दिसले पाहिजे; ते नावापुरते नको
By admin | Published: December 30, 2016 11:39 PM