नाशिक : नाशिककरांच्या दृष्टीने त्रासदायक ठरलेला त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ दरम्यानच्या स्मार्ट रोडचे काम मंद गतीने सुरूच असून, दुसऱ्या बाजूच्या रस्त्याचे खोदकाम सुरू झाले; परंतु पहिला टप्पा अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. इतका विलंब करूनही ठेकेदाराला आत्ताशी मार्च महिन्यात नोटीस बजाविण्यात आली असून, त्यामुळे काम कधी होणार हा प्रश्न कायम आहे.स्मार्ट सिटी कंपनीने त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ या १.१ किलोमीटर रस्त्याची स्मार्ट रोडसाठी निवड केली. त्यानंतर वर्ष झाले तर अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका या बाजूचे काम पूर्ण झालेले नाही. या मार्गावरील शाळा आणि दुकानदार तसेच रहिवाशांचे प्रचंड हाल होत असून, कोणत्याही नियोजनाशिवाय रस्त्याचे काम करण्यात येत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.स्मार्ट रोडचे पथदर्शी काम संथगतीने सुरू असल्याने अनेकदा टिका झाली; परंतु ठेकेदार तारीख ते तारीख अशी मुदत देत असून, कंपनी तसेच महापालिकेने सपशेल शरणागती पत्करल्याची टिका होत आहे. माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळात पुढे न गेलेले काम विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यामुळे काहीसे पुढ सरकले असले तरी जानेवारीपासून त्यांनाही ठेकेदार केवळ एकेक तारखा सातत्याने देत आहे.मेहेर ते सीबीएसपर्यंत मार्ग सुरू होण्यास गमे यांनी डेडलाइननंतर तब्बल दीड महिन्यानी हा टप्पा खुला करण्यात आला आहे. त्याचेही काम अर्धवट असताना आता ऐन निवडणुकीच्या धावपळीत त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ या बाजूचे काम सुरू करण्यात आले असून, डांबरी रस्ता खोदण्यास प्रारंंभ झाला आहे. एक बाजूचा रस्ता खुला नाही तोच दुसऱ्या बाजूच्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत.स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीने यासंदर्भात बुधवारी (दि. २७) पत्रक प्रसिद्धीला दिले असून, त्यात पुन्हा अडचणींचा पाढा वाचला आहे. त्यानंतर ठेकेदाराला मार्च महिन्यात नोटीस बजावल्याचे नमूद केले आहे; परंतु रस्ता केव्हा पूर्ण करणार या विषयावर मात्र कोणत्याही प्रकारचा उल्लेख केलेला नाही. वारंवार कामाला विलंब होऊनही मनपाकडून संबंधित ठेकेदाराला आता कुठे नोटीस बजावली आहे. असे असले तरी अजूनही कामाच्या पूर्णत्वाची शाश्वती देण्यात आलेली नाही.तीच ती कारणे..स्मार्ट सिटी कंपनीने मेहेर ते अशोकस्तंभ दरम्यान कामे रेंगाळण्यामागे कंपनीने नवरात्र, गणेशोत्सव आणि दिवाळीचे कारण दिले असले तरी मुळातच ते आकस्मिक नव्हते. त्यामुळे तरीही प्रशासनाने नियोजन नव्हते याबद्दल आश्यर्च व्यक्त करण्यात येत आहे.पहिल्या टप्प्यात त्र्यंबक नाका ते सीबीएस आणि मेहेर सिग्नल असा टप्पा असणार आहे. सध्या एका लेनमधून वाहतूक सुरू असून, मेहेर सिग्नल ते सीबीएस हा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे, असे कंपनीने रस्ता खुला केल्यानंतर आता सुमारे पंधरा दिवसाने अधिकृतरीत्या कळविले आहे.
स्मार्ट रोडचे काम, वर्षभर थांब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 1:01 AM