बिटको रुग्णालयात स्थानिकांचा उपद्रव
नाशिक : नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात स्थानिक कार्यकर्ते तसेच काही राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांचा उपद्रव सुरू असल्याच्या तक्रारी आता समोर आल्या आहेत. त्यामुळे या रुग्णालयात तसेच आवारात अनेकदा वादविवाद, हाणामारीचे प्रसंग उद्भवत असतात.
तुरळक रिक्षा वाहतूक सुरू
नाशिक : शहर परिसरात अनेक ठिकाणी तुरळक प्रमाणात रिक्षातून प्रवासी वाहतूक सुरूच असल्याचे दिसते. सध्या प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली असली तरी सकाळच्या सुमारास रिक्षामधून प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे दिसते.
तरुणांना भाजीपाला व्यवसायाचा आधाार
नाशिक : लॉकडाऊनमुळे अनेक तरुणांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. शालेय वाहतूक, दुकाने, प्रवासी वाहतूक तसेच हातगाडीवर साहित्य विक्री करणाऱ्या तरुणांनी भाजीपाल्याच्या व्यवसायाचा रोजगार शोधला आहे. भाजीपाला व्यवसाय तरुणांसाठी आधार ठरत आहे.
सोमवार बाजारात नियमांचे उल्लंघन
नाशिक : देवळाली गावातील सोमवार आठवडा बाजार बंद करण्यात आलेला असताना, सोमवारी अनेक विक्रेते या ठिकाणी बसत असल्याने त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. अनधिकृतपणे सोमवार बाजार भरविणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
सोमवारी दुकानांचे शटर अर्ध्यावर
नाशिक : शहरात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आलेला असल्याने सर्वच व्यवसाय बंद आहेत. मात्र सोमवारी शहरात अनेक ठिकाणी दुकानांचे शटर अर्ध्यावर उघडण्यात येऊन व्यवसाय केला जात असल्याचे दिसून आले. शनिवार, रविवार सलग दोन दिवस पूर्णपणे दुकाने बंद ठेवली जात असल्याने सोमवारी काही दुकानदार दुकाने सुरू ठेवत आहेत.
झोपडपट्टी परिसरात मास्ककडे दुर्लक्ष
नाशिक : जेलरोड कॅनॉल झोपडपट्टीतील नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येते. कुणीही मास्क वापरत नसून सामाजिक अंतराच्या नियमांकडे देखील दुर्लक्ष केले जात आहे. स्वच्छतेच्याबाबतही दुर्लक्ष होत असून येथील नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असताना, त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.