सिन्नर: कोतवालांच्या शिपाई पदावर झालेल्या पदोन्नत्या तत्काळ देण्यात याव्यात, कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या कोतवालांच्या वारसांना ५० लाखांची मदत आणि शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील कोतवाल संघटनेने गुरुवार (दि.१५) पासून अन्नत्याग आणि कामबंद आंदोलन पुकारले आहे. सिन्नर तालुका कोतवाल संघटनेच्या वतीने तहसीलदार राहुल कोताडे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
शासन नियमानुसार कोतवालांना पदोन्नती देण्याचे ठरल्यानंतर जिल्ह्यातील ११९ कोतवालांच्या मुलाखती घेण्यात आल्या; मात्र ७ महिने उलटूनही त्यांना शिपाई पदावर नियुक्त करण्यात आले आहे. त्यांचे १५ हजार रुपये प्रत्येक महिन्याप्रमाणे मानधनही रखडले आहे. याच दरम्यान कोरोना काळात सिन्नर तालुक्यातील संजय चांगदेव धरम आणि निफाड तालुक्यातील चंद्रकांत विष्णू साळवे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांना शिपाई पदावर नियुक्ती दिलेली असती तर शासकीय मदत मिळण्यात वारसांना सामोरे जावे लागले नसते. दरम्यान, शासनाकडून अटल पेन्शन योजना आणि सामूहिक गटविम्याचे हप्ते कपात केलेले नाहीत. पात्र कोतवालांना १५ हजार रुपये मानधनही देण्यात येत नाही. ग्रामीण भागात कोतवालांच्या जागेवर खासगी व्यक्तींना काम करण्यास मुभा देण्यात येऊ नये, रखडलेल्या शिपाई पदावर पदोन्नती तत्काळ देण्यात यावी, मयत कोतवालांच्या वारसांना तत्काळ नोकरीत सामावून घ्यावे, अशा मागण्यांचे निवेदन तहसीलदार कोताडे यांना देण्यात आले. याप्रसंगी प्रवीण कर्डक, कैलास तुपसुंदर, पांडुरंग कांडेकर, ज्ञानेश्वर गडाख, योगेश लोंढे, माणिक माळी, नवनाथ म्हस्के, साहेबराव मंडले, बबन माळी, कैलास ताठे, खंडेराव राजगुरू, शरद गोफणे, रामदास भालेराव, संतोष पगार, रवींद्र चिने, विलास कदम आदी यावेळी उपस्थित होते.
----------------
सिन्नर तालुका कोतवाल संघटनेच्या वतीने तहसीलदार राहुल कोताडे यांना विविध मागण्यांचे निवेदन देताना प्रवीण कर्डक, पांडुरंग कांडेकर, नवनाथ मस्के, कैलास तुपसुंदर आदी. (१६ सिन्नर १)