सिडको : आधीच रस्त्याची दुरवस्था, त्यात डागडुजीही निकृष्ट दर्जाची असल्याचे दिसल्यानंतर शिवतीर्थ परिसरातील नागरिकांनी रोष व्यक्त करीत हे काम बंद पाडले. माजी विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांनीही नागरिकांना समर्थन दिले, तर प्रभागाचे नगरसेवक अनिल मटाले यांनी सदर रस्त्याच्या कामासाठी निविदाप्रक्रिया पूर्ण झाली असून, तीन महिन्यांनी डांबरीकरण करण्यात येईल, असे आश्वासन दिले.सिडकोतील प्रभाग ४८ मध्ये हा प्रकार घडला. या प्रभागातील शिवतीर्थ कॉलनीत संभाजीनगर परिसर असून, तेथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे पालिकेच्या वतीने खड्डे बुजविण्याचे काम याठिकाणी सुरू करण्यात आले; परंतु खड्ड्यांमधील माती आणि घाण न काढताच त्यावर डांबर टाकण्यात येत होते. वरवरची ही मलमपट्टी लक्षात येताच परिसरातील नागरिक जमा झाले आणि संबंधितांना जाब विचारून काम बंद पाडले. यावेळी प्रभागाचे नगरसेवक आणि मनसेचे गटनेता अनिल मटाले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. ते वेळेत न आल्याने माजी विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांना याठिकाणी बोलविण्यात आले. त्यांनीही खड्डे भरण्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगितले. यावेळी नागरिकांनी नगरसेवक मटाले यांच्यावरही रोष व्यक्त केला. काही वेळाने मटाले यांनी याठिकाणी येऊन सदरच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम मंजूर असून, लवकरच पावसाळा संपताच हे काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तथापि, खड्डे भरण्याचे काम मात्र नागरिकांनी बंदच ठेवण्यास भाग पाडले.यावेळी किरण थोरात, अनिल सैंदाणे, विपुल भामरे, बबलू वाघ, नीलेश नेहेते, नितीन पाटील, अशोक आहिरे, सागर जाधव यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)
काम बंद पाडले
By admin | Published: June 28, 2015 1:56 AM