पिळकोस : पिळकोस व खामखेडा या दोन्ही गावांसाठी खामखेडा शिवारात पायाभूत सुविधा विकास आराखडा योजनेअंतर्गत २९ जानेवारी २०१५ मध्ये ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलेल्या ३३/११केव्ही उपकेंद्राचे काम एकवीस महिने उलटून पूर्ण होत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. परिसरातील शेतकरी बांधवांकडून रोष व्यक्त केला जात आहे . या कामास २.१० कोटी रुपये मंजूर असल्याचे सांगण्यात आले होते. उद्घाटनानंतर एकवीस महिने उलटूनही काम संथगतीने सुरु असल्याने महावितरणलाही कसलेही गांभीर्य नसल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत आहे. संबंधित अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. खामखेडा व पिळकोस परिसरातील वीजग्राहकांना ३५ किमी अंतरावरील ठेंगोडा उपकेंद्रातून वाहिनीद्वारे अनेक वर्षांपासून कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्यामुळे ३३/११ केव्ही केंद्र मंजूर करण्यात आले आहे. या कामासाठी अंदाजे २.१० कोटी रु पये मंजूर असून, ५ एमव्हीए क्षमतेच्या उपकेंद्राचे काम अपूर्णावस्थेत आहे. (वार्ताहर)
उपकेंद्राचे काम अपूर्णावस्थेत
By admin | Published: October 16, 2016 10:26 PM