उमराणे : उमराणे- निमगाव चौफुलीवरील भुयारी मार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने पादचाऱ्यांसह छोट्यामोठ्या वाहनचालकांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच नुकत्याच वडाळीभोईजवळ ट्रक अपघातात तीन जण ठार झाल्याने नागरिकांनी याचा धसका घेतला असून, भुयारी मार्गासाठी होत असलेला विलंब मोठ्या अपघातास कारणीभूत ठरू शकतो त्यामुळे उर्वरित काम त्वरित सुरू करण्याची मागणी होत आहे. २००४ मध्ये पिंपळगाव ते धुळे या दरम्यान महामार्ग क्रमांक ३ चे चौपदरीकरणाचे काम सोमा कंपनीतर्फे करण्यात आले होते. या दरम्यान उमराणे-तिसगाव चौफुलीवर वाहतूक व वर्दळीच्या दृष्टिकोनातून उड्डाणपुलाची गरज असताना कंपनीतर्फे भुयारी मार्ग बांधण्यात आला. प्रत्येक अपघाताच्या वेळी नागरिकांचा उद्रेक होऊन आंदोलने झाली. मोर्चा काढून उपोषणे करण्यात आली. शेवटी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना लक्ष घालावे लागले. त्यांनी लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आदेश दिले परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. नागरिकांच्या उद्रेकामुळे भुयारी मार्गाचे काम सुरू झाले परंतु तेही कासवगतीने. संबंधितांनी वडाळीभोई अपघातातून धडा घेऊन काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)सदर भुयारी मार्ग अत्यंत चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आल्याने या मार्गातून तब्बल अकरा वर्षांत एकही पादचारी गेलेला नाही. परिणामी मुख्य रस्त्यावरच पादचारी, शालेय विद्यार्थी व वाहनचालकांना ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे गेल्या अकरा वर्षांत चौफुलीवर वारंवार अपघात होऊन तिसगाव येथील शालेय विद्यार्थ्यासह १४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
उमराणे येथील भुयारी मार्गाचे काम रखडले
By admin | Published: October 25, 2015 11:05 PM