वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील सॅमसोनाइट साउथ एशिया प्रा.लि. या कंपनीतील कामगारांनी वेतन कपातप्रश्नी शुक्रवारी (दि.१२) सकाळी १० वाजेच्या सुमारास कंपनीच्या प्रवेशद्वारावर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत आंदोलन केले. यावेळी कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.कोरोनामुळे कंपनी अडीच महिन्यांपासून बंद आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कंपनीने कामगारांना कुठलीही पूर्व सूचना न देता त्यांना रजा देण्यात आल्या आहेत. परंतु कंपनी व्यवस्थापन व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांकडून काम करून घेत असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. तसेच कामगारांना तीन महिन्याचे वेतन देताना जवळपास ८० टक्के रक्कम कपात केली गेली तर अधिकारीवर्गाची फक्त २० टक्केच रक्कम कपात केली गेली आहे, असे कामगारांनी सांगितले. त्यामुळे संतप्त होत कामगारांनी सीटू संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन करीत कंपनीने तीन महिन्यांचा पगार द्यावा व कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, अशी मागणी केली. यावेळी सीटू संघटनेचे देवीदास अडोळे, कामगार प्रतिनिधी विजय जाधव, नीलेश तिदमे, मंगेश नलावडे, रमेश परदेशी, राजेंद्र सोनवणे, सोमनाथ नाठे, मधुकर खडांगळे आदींसह कामगार उपस्थित होते.-------------------------लॉकडाऊन कालावधीत कामगारांचे मे महिन्याचे पूर्ण वेतन देण्यात यावे, अतिशय कमी रकमेत कामगारांनी आपले घरांचे हप्ते भरायचे की, उदरनिर्वाह करायचा, असा प्रश्न निर्माण झाला असून, कामगारांना पूर्ण वेतन मिळाले पाहिजे तसेच सर्वांना कामावर घेतले पाहिजे इतकीच मागणी आम्ही केली आहे.- देवीदास अडोळे,राज्य सचिव, सीटू संघटना----------------------------------शासन निर्णयानुसार कामगारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा यासाठी आपण काही प्रमाणात वेतन कामगारांना देऊ केले आहे. लॉकडाऊनमुळे सध्या मालाला उठाव नाही. यासाठी आम्ही उत्पादन न घेता फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमामुळे सर्व कामगारांना न बोलविता उपस्थित व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांकडूनच दुरु स्तीचे काम करीत आहोत.- सुयोग जोशी, व्यवस्थापक, सॅमसोनाइट साउथ एशिया
गोंदे औद्योगिक वसाहतीत कामगारांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 9:27 PM