नाशिक- केंद्र सरकारच्या कथीत कामगार विरोधी धोरणाचा निषेध म्हणून विविध कामगार कर्मचारी संघटनांंनी संपाला नाशिक महापालिकेत मोठा प्रतिसाद मिळाला. महापालिकेचे पाच हजार कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्याच प्रमाणे घंटागाडीसह अनेक सेवा ठप्प झाल्या आहेत.
महापालिकेतील कामगार कर्मचा-यांचे प्रश्न प्रलंबीत असून त्यामुळे थेट देशव्यापी संपाचा संंबंध नसला तरी महापालिकेतील सर्व कामगार संघटना संपात सहभागी झाल्या आहेत. महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांसमोर सकाळी निदर्शने करण्यात आली. याशिवाय महापालिकेच्या राजीव गांधी भवनासमोर मोठ्या संख्येने कामगार जमले होते. याठिकाणी जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला.
कर्मचा-यांना सहाव्या वेतन आयोगाच्या संरचनेनुसारच सातवा वेतन आयोग द्यावा, रिक्तपदे त्वरीत भरावीत, सेल्फी हजेरी बंद करावीत अशा विविध मागण्यांचे निवेदन आयुक्त राधाकृष्ण गमे यांना देण्यात आले. म्युनिसीपल कर्मचारी संघटनेचे प्रविण तिदमे, गजानन शेलार, तानाजी जायभावे, सुरेश मारू, सुरेश दलोड, राजेंद्र मोरे, अनिल बहोत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.