नाशिक : प्रादेशिक परिवहन विभागाकडून शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर अन्यायकारक होत असलेल्या कारवाईच्या विरोधात श्रमिक रिक्षा-टॅक्सी टेम्पो चालक-मालक सेनेच्यावतीने शनिवारी दुपारी पेठरोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली. आरटीओकडून होणा-या कारवाईबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांना लेखी निवेदन देण्यात आले.प्रादेशिक परिवहन विभागाकडून शालेय विद्यार्थी वाहतूक करणा-या वाहनांवर अन्यायकारक कारवाई केली जाते. यात वाहने अडवून विद्यार्थ्यांना भररस्त्यात उतरवून दिले जाते, चालकाचे काही म्हणणे ऐकून घेतले जात नाही, भरमसाठ दंड आकारणी केली जाते तसेच कारवाई दरम्यान चालकांना अन्यायकारक वागणूक दिली जाते, वाहन जमा केल्यानंतर ते वाहन दहा ते पंधरा दिवस निलंबित केले जाते, आदींसह नवीन रिक्षा स्टँड चे नियोजन करणे, पंधरा वषार्चा वन टाइम टॅक्स रिफंड मिळणे आदींसह विविध मागण्या मांडण्यात आल्या.श्रमिक सेनेचे संस्थापक सुनील बागुल यांच्या नेतृत्वाखाली शेकडोच्या संख्येने जमलेल्या आंदोलकांनी प्रादेशिक परिवहन अधिकाºयांच्या मुख्य प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडल्याने येण्या-जाण्यासाठी रस्ता बंद करण्यात आला. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने सह प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय आहेर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष भगवान पाठक, अजय बागुल, मामा राजवाडे, सय्यद नवाज, शंकर बागुल, पुरुषोत्तम पाथरे, राजू जाधव, किरण डहाळे, आदी उपस्थित होते.